मालेगाव, (प्रतिनिधी) २१ ऑगस्ट - मालेगाव शहरात डेंग्यूचे १६ सक्रिय रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. डेंग्यूचा प्रसार तातडीने रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महानगरपालिका व आरोग्य विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. आगामी तीन दिवसांत शहरात १० हजार डेंग्यू चाचण्या पूर्ण करण्याचे कडक उद्दिष्ट त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहे.
या बैठकीस महापौर शेख नसरीन बानो खालिद, स्थायी समिती सभापती एजाज बेग आणि नगर प्रशासन सहआयुक्त श्याम विठ्ठल गोसावी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्य उपाययोजना:
हॉटस्पॉट मॅपिंग व ताप चिकित्सालये:
महामारी तज्ज्ञांमार्फत रुग्णांचे भौगोलिक मॅपिंग करून डेंग्यूचे हॉटस्पॉट निश्चित केले जातील. तसेच संशयित रुग्णांचे वेळेत निदान व्हावे यासाठी शहरात तातडीने 'ताप चिकित्सालये' (Fever Clinics) सुरू केली जात आहेत.
दिवसा कंटेनर सर्व्हे, संध्याकाळी फॉगिंग:
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी दिवसा घरोघरी जाऊन कंटेनर सर्वेक्षण केले जाईल. संध्याकाळच्या वेळी शहरात तीव्र फॉगिंग मोहीम राबवण्यात येईल. तसेच साचलेल्या पाण्यात अळ्या नष्ट करण्यासाठी गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत.
दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा:
नागरिकांना घरात पाणी साठवून ठेवावे लागू नये, यासाठी शहरात दर दोन दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मनपा प्रशासनाला दिले आहे.
रुग्णांची प्रकृती स्थिर:
सध्या उपचार घेत असलेल्या सर्व १६ रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. रुग्णांच्या संपर्कातील व परिसरातील नागरिकांचीही मोफत चाचणी केली जात आहे.
जनसहभागाचे आवाहन:
"प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. परंतु, नागरिकांच्या सहभागाशिवाय डेंग्यूवर मात शक्य नाही. आठवड्यातून एकदा 'ड्राय डे' पाळून साठवलेली भांडी स्वच्छ करावीत व परिसरात पाणी साचू देऊ नये."
— आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, नाशिक)