छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) २१ ऑगस्ट - वाळूज परिसरातील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर आज काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुण मुलाची समजूत काढून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना वडिलांचा तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले; डोळ्यांदेखत मुलगा आणि पतीला दरीत पडताना पाहून शोकाकुल आईनेही डोंगरावरून खाली उडी घेतली. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचाही जागीच मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे : कुणाल मुरलीधर चांदवडे (वय १८, मुलगा) मुरलीधर चांदवडे (वडील) संगीता मुरलीधर चांदवडे (आई)
तीन तास सुरू होते मनधरणीचे प्रयत्न : मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल चांदवडे हा शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास नैराश्यातून तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर पोहोचला होता. तो डोंगराच्या अगदी टोकावर उभा राहून आत्महत्येचा इशारा देत होता. ही माहिती मिळताच त्याचे आई-वडील आणि वाळूज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. डोंगराच्या कडेला उभा असल्याने मुलाला पकडणे शक्य नव्हते; त्यामुळे आई-वडील आणि पोलीस तब्बल तीन तास त्याची समजूत काढण्याचा आणि त्याला खाली उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. 'बाळा असं करू नको' म्हणून आई अक्षरशः हात जोडून विनवण्या करत होती.
एका क्षणात होत्याचे नव्हते झाले : दुपारी एक वाजेच्या सुमारास कुणालने ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अचानक दरीत उडी मारली. त्याच क्षणी त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या वडिलांचाही तोल गेला आणि तेही मुलासोबत खोल दरीत कोसळले. पती आणि पोटचा गोळा डोळ्यांदेखत मृत्यूच्या दारात गेल्याचे पाहून आईने हंबरडा फोडत क्षणाचाही विचार न करता थेट दरीत उडी घेतली.
डोंगरावरून खाली कोसळल्याने तिघांचाही गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्राथमिक अंदाजानुसार कुणाल कौटुंबिक कारणावरून मानसिक नैराश्यात होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.