नाशिक, (प्रतिनिधी) २१ ऑगस्ट - भारतीय जहाज वाहतूक महामंडळात सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका सुशिक्षित बेरोजगाराला तब्बल १५ लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार वर्षे उलटूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांत धाव घेतली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
शिखरेवाडी येथील अमर हौसिंग सोसायटीत राहणारे अनिकेत अनिल काळे यांची २०२२ मध्ये गजेंद्र रामदासजी कुरेकर नामक व्यक्तीशी भेट झाली होती. यावेळी कुरेकरने भारतीय जहाज वाहतूक महामंडळात आपल्या वरिष्ठ पातळीवर चांगल्या ओळखी असल्याचे सांगितले. अनिकेत यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना महामंडळात सहाय्यक व्यवस्थापकपदी नोकरी मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले.
१७ लाखांची मागणी अन् टाळाटाळ :
वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी लागतील असे सांगून संशयित कुरेकरने अनिकेत यांच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल १७ लाख रुपये उकळले. मात्र, चार वर्षे उलटून गेली तरी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे अनिकेत यांनी पैशांसाठी तगादा लावला असता संशयिताने केवळ २ लाख रुपये परत केले. उर्वरित १५ लाख रुपये देण्यास तो सातत्याने टाळाटाळ करत राहिला.
अखेर आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनिकेत काळे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित गजेंद्र कुरेकरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने करत आहेत.