नाशिक, (प्रतिनिधी) २१ ऑगस्ट - नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न आधीच राज्यभरात गाजत असताना, महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा आणखी एक अजब नमुना समोर आला आहे. गंगापूर रोडवरील प्रसिद्ध नवश्या गणपती परिसरात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खडी-डांबर घेऊन आलेला भलामोठा ‘हायवा’ (डंपर) रस्ता अचानक खचल्याने थेट खड्ड्यातच रुतला. या घटनेमुळे महापालिकेच्या रस्ते दुरुस्ती आणि कुंभमेळा विकासकामांच्या दर्जाचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. हा खड्डा जवळपास १० ते १२ फूट खोल असल्याची माहिती मिळते आहे.
रस्ता खचला अन् डंपर अडकला :
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर रोडवरून नवश्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी संबंधित ठेकेदाराने हायवा डंपर मागवला होता. मात्र, कामाच्या ठिकाणी पोहोचताच रस्त्याचा भराव अचानक खचला आणि संपूर्ण डंपर एका बाजूने खड्ड्यात गेला. डंपर खड्ड्यात रुतल्याचे पाहताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
कुंभमेळ्याच्या कामांवरून तीव्र रोष :
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेली विविध विकासकामे आणि डांबरीकरणाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नाशिककरांनी केला आहे. "ज्या रस्त्यावर साधे डंपरचे वजन पेलण्याची क्षमता नाही, त्या रस्त्यांवरून नागरिक कसा प्रवास करणार?" असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सोशल मीडियावर टीकेची झोड :
खड्डे बुजवायला आलेल्या डंपरचाच खड्ड्यात अपघात झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर क्षणात तुफान व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या संगनमतावर जोरदार टीका करत विविध मीम्स आणि संतप्त प्रतिक्रियांद्वारे प्रशासनाची खिल्ली उडवली आहे. शहरातील रस्त्यांची कामे तातडीने दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.