शिक्षण क्षेत्रात नाशिक अव्वल होणार... हा 'मास्टर प्लॅन' निश्चित...

Share:
Main Image
Last updated: 21-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २१ ऑगस्ट - नाशिक जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता व कार्यक्षमता वाढवून 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स' (PGI-D) मध्ये जिल्ह्याला टॉप-५ मध्ये आणण्यासाठी जिल्हा परिषद नाशिकच्या शिक्षण विभागाद्वारे (प्राथमिक) विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मध्यवर्ती सभागृहात १९ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा पार पडली.

नाशिक जिल्ह्याला २०२५-२६ मध्ये ३६५ गुणांसह १२ वा क्रमांक मिळाला आहे (मागील वर्षी ३५५ गुणांसह ९ वा क्रमांक होता). त्यामुळे या क्रमवारीत सुधारणा करून नाशिकला अग्रस्थानी नेण्यासाठी अचूक डेटा, प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित पाठपुरावा करण्यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.

कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक सूचना आणि निर्णय:

Advertisement

UDISE+ पोर्टलवर अचूक नोंद: प्रत्यक्ष शाळेतील वस्तुस्थिती आणि UDISE+ पोर्टलवरील माहिती यामध्ये कोणतीही तफावत राहू नये. मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक व केंद्रप्रमुखांनी शाळांची माहिती वेळेत आणि अचूक अद्ययावत करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी यांनी केले.

सहज साध्य उद्दिष्टांवर तातडीने भर: ज्या निर्देशांकांमध्ये कमी कालावधीत अधिक गुण मिळवणे शक्य आहे, अशा बाबींवर प्राधान्याने काम करण्याचा कृती आराखडा मांडण्यात आला. यात विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक प्रशिक्षण, केंद्रप्रमुखांच्या शाळाभेटी, डिजिटल शिक्षण, किचन गार्डन, शाळा सुरक्षा आणि CWSN विद्यार्थ्यांसाठीच्या सोयी यांचा समावेश आहे.

दोन सत्रांत व्यापक नियोजन: पहिल्या सत्रात बागलाण, चांदवड, मालेगाव, कळवण, सुरगाणा, देवळा व नांदगाव; तर दुसऱ्या सत्रात नाशिक, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, सिन्नर, इगतपुरी, पेठ व येवला या तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व इतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सत्रांचे सुलभीकरण उपशिक्षणाधिकारी अनिल पुदाट, मनोहर सूर्यवंशी आणि गटशिक्षणाधिकारी निलेश पाटोळे यांनी केले. केवळ कागदोपत्री माहिती न भरता प्रत्यक्ष अंमलबजावणी करून नाशिक जिल्ह्याची PGI क्रमवारी टॉप-५ मध्ये आणण्याचा संकल्प सर्व अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement

Comments

No comments yet.