न्यू पंडित कॉलनीत बिल्डरच्या बंगल्यात धाडसी घरफोडी... इतक्या लाखांची चांदी लंपास...

Share:
Main Image
Last updated: 21-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ ऑगस्ट - शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या न्यू पंडित कॉलनी परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात रात्रीच्या सुमारास शिरून अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ३७ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या भांड्यांची घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरणपूर रोडवरील न्यू पंडित कॉलनी येथील 'अरिहंत' बंगल्यात राहणारे बांधकाम व्यावसायिक करण राजेंद्र शहा (वय ३७) हे कुटुंबीयांसह रात्री झोपलेले असताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या किचनच्या बाहेरील पॅसेजमधील लोखंडी ग्रीलवरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर किचनच्या काचेची खिडकी उघडून आत शिरत किचन ट्रॉलीच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या सुमारे ७ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या विविध चांदीच्या वस्तू चोरून नेल्या.

चोरीस गेलेल्या वस्तू :

५ किलो वजनाचे ५ चांदीचे डिनर सेट (अंदाजे किंमत १,५०,०००/-)

Advertisement

२ किलो वजनाचे २ चांदीचे जग (अंदाजे किंमत ६०,०००/-)

चांदीच्या वाट्या, डिश, बाऊल, ग्लास आणि चमचे (अंदाजे किंमत २७,०००/-)

एकूण किंमत : २,३७,०००/- रुपये.

या प्रकरणी करण शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५ व ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.