केशव खेडकर, (नाशिक) २१ ऑगस्ट - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी वरील सटाणा-मंगरूळ रस्त्याच्या कामातील सर्व अडचणी तातडीने दूर करून कामाला गती देण्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध विभागांनी आपापसांत समन्वय राखून नागरिकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व सूचना:
अतिक्रमण आणि भूसंपादन: शहरातील अतिक्रमांवर तातडीने कारवाई करावी. भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी.
वाहतूक कोंडीवर बायपासचा पर्याय: शहरातील मध्यवर्ती भागात शाळा, बसथांबे आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपास आणि पर्यायी मार्गांचे अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करून मंत्रालयाकडे पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले.
१५ दिवसांत कार्यवाही: शहरातील सीमांकन, रिमॅपिंग, क्रॉस सेक्शन ड्रॉइंग व नकाशे तयार करण्यासाठी नगरपालिकेने सहकार्य करावे. पुढील १५ दिवसांत संबंधित प्रस्तावांवर आवश्यक कार्यवाही करून पाठपुरावा केला जावा.
भविष्याचा विचार करून पायाभूत सुविधा: पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह इतर विविध सेवा-सुविधा शक्यतो भूमिगत पद्धतीने नियोजित कराव्यात.
या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सटाणा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष हर्षदा पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, प्रांताधिकारी महेश शेलार आदी प्रत्यक्ष उपस्थित होते; तर व्हीसीद्वारे (Video Conferencing) राष्ट्रीय महामार्गाचे सचिव संतोष शेलार व प्रादेशिक अधिकारी प्रशांत हेगडे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.