त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 20-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २० ऑगस्ट - त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, शनिवार आणि सोमवार या गर्दीच्या दिवशी 'व्हीआयपी दर्शन' (VIP दर्शन) पूर्णपणे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पैसे घेऊन मागच्या दाराने दर्शन देण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट करत असे प्रकार करताना ट्रस्टी किंवा अन्य कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश नाशिकचे नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांना दिले आहेत.

नागरिक आणि भाविकांच्या सोयीसाठी साध्या वेशातील पोलीसही मंदिर परिसरात तैनात केले जाणार आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन यांनी पहिल्याच दिवशी घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी कुंभमेळा आणि त्र्यंबकेश्वर गर्दी नियोजनाचा आढावा घेतला.

बैठकीतील प्रमुख निर्णय असे:

कुंभमेळा तयारी आणि आरोग्य सुविधा:

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज केली जात असून १०० बेडचे रेडीमेड रुग्णालय तातडीने ताब्यात घेतले जाणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी हेलिकॉप्टर आणि पुरेशा रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाईल.

Advertisement

रस्ते रुंदीकरण व वाहतूक कोंडीवर तोडगा:

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण आणि रिंगरोडची कामे वेगाने सुरू आहेत. तसेच नाशिक शहरातील द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कालव्यावर 'बॉक्स' टाकून ४ पदरी रस्ता तयार करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची निविदा लवकरच काढली जाणार आहे.

विरोधकांच्या निविदा आरोपांना प्रत्युत्तर:

गुजरातमधील ठेकेदारांना कामांच्या निविदा दिल्या जात असल्याच्या आरोपांवर महाजन यांनी सर्व प्रक्रिया १००% पारदर्शक असल्याचा दावा केला. निविदा २० ते ४२ टक्के कमी दराने गेल्या असल्याने कागदपत्रे तपासूनच आरोप करावेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

कुंभमेळा ध्वजारोहण व निमंत्रण:

येत्या ३० ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यासाठी स्वतः दिल्लीला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

Advertisement

Comments

No comments yet.