नाशिक, (प्रतिनिधी) २० ऑगस्ट - शहरात चोरट्यांचे धाडस प्रचंड वाढले असून आता दुचाकींऐवजी चक्क चारचाकी वाहनांचा वापर करून चेनस्नॅचिंग करण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाचे सोन्याचे लॉकेट हातचलाखीने लांबवल्याची दुसरी घटना घडली आहे. या दोन्ही प्रकरणांत नाशिकरोड आणि पंचवटी परिसरात गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिली घटना: एर्टिगा कारमधून आले अन् २ तोळ्यांची पोत ओरबाडली
अमृताधाम बसस्टॉप परिसरातील उड्डाणपुलाखाली बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेला लुटण्यात आले.
पीडित महिला: सुनंदा राजेंद्र भदाणे (रा. विद्यानगर, मखमलाबाद रोड).
घटना: बुधवारी (दि. १९) दुपारी भदाणे या लोहणेर (जि. देवळा) येथे जाण्यासाठी अमृतधाम बसथांब्यावर उभ्या होत्या. यादरम्यान एक पांढऱ्या रंगाची 'इर्टिका' कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या भामट्याने क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीची २ तोळे वजनाची सोन्याची शॉर्ट पोत हिसकावली अन् सुसाट कारमध्ये बसून पोबारा केला.
तपास: पोलीस हवालदार सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दुसरी घटना: 'आम्ही पोलीस आहोत' सांगत ७३ वर्षीय वृद्धाला गंडा
चेहडी पंपिंग परिसरातील नरवीर तानाजी उद्यान भागात मित्रांसोबत फेरफटका मारणाऱ्या वृद्धाला भामट्यांनी गाठले.
पीडित वृद्ध: माणिकराव शिरसाठ (वय ७३). याबाबत मुलगा योगेश शिरसाठ यांनी फिर्याद दिली आहे.
घटना: सोमवारी (दि. १७) सायंकाळी दोन दुचाकींवरून आलेल्या भामट्यांनी 'पोलीस' असल्याची बतावणी करत "पुढील भागात तपासणी सुरू आहे, अंगावरील दागिने काढून रुमालात बांधून ठेवा," असा सल्ला दिला. मदत करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी हातचलाखी करत २ तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट लांबवले.
तपास: नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार मोरे अधिक तपास करत आहेत.