कुंभमेळ्यानिमित्त नाशिक पोलिसांना मिळणार ६६ नवीन... ७.२२ कोटींचा निधी मंजूर...

Share:
Main Image
Last updated: 20-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) २० ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्ह्यातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस दलाला अधिक हायटेक आणि सतर्क करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांसाठी एकूण ६६ नवीन वाहनांच्या खरेदीसाठी ‘जिल्हा वार्षिक योजने’तून ७ कोटी २२ लाख ३४ हजार ५६४ रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार ही मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

वाहनांचे वाटप खालीलप्रमाणे:

पोलीस आयुक्त (नाशिक शहर): १० वाहने

पोलीस आयुक्त कार्यालय (नाशिक शहर): १६ वाहने

Advertisement

पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण): ४० वाहने

मोबाईल सर्व्हिलन्स आणि आधुनिक यंत्रणा

गस्तीसाठी मिळणाऱ्या या सर्व ६६ वाहनांमध्ये अत्याधुनिक 'मोबाईल सर्व्हिलन्स सिस्टिम' कार्यान्वित केली जाणार आहे. या कॅमेरा निगराणी यंत्रणेमुळे थेट व्हिडीओ रेकॉर्डिंग शक्य होईल, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीवर त्वरित लक्ष ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था राखणे सोपे जाईल. याशिवाय, गर्दीच्या नियंत्रणासाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी या वाहनांवर 'पब्लिक ॲड्रेस सिस्टिम' (सार्वजनिक ध्वनिवर्धक प्रणाली) देखील बसवण्यात येणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यात लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेता, गस्त वाढवण्यासाठी पोलीस दलाने वाहनांची मागणी केली होती. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी तात्काळ निधी वितरणाचे आदेश जारी केले. या निर्णयामुळे नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि वेगवान होणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.