नाशिक जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम... ४ विशेष पथकांच्या रडारवर १७ संस्था...

Share:
Main Image
Last updated: 20-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २० ऑगस्ट - जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील कंत्राटी कामगारांना (विशेषतः सफाई कामगारांना) शासनाच्या नियमानुसार किमान वेतन आणि इतर सोयी-सुविधा मिळतात की नाही, याची कसून चौकशी केली जाणार आहे. कामगारांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चार विशेष तपासणी पथकांची स्थापना केली असून, २५ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १७ स्थानिक स्वराज्य संस्थांची धडक तपासणी केली जाणार आहे.

किमान वेतन अधिनियम १९४८, EPF-ESIC आणि कंत्राटी कामगार कायद्यांतर्गत ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या काळात एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या आर्थिक वर्षातील ठेकेदारांची देयके, कामगारांची बँक खाती आणि हजेरी पुस्तके तपासली जातील.

कोणत्या बाबींची होणार मुख्य पडताळणी?

वेतन व बँक जमा: कंत्राटदारांनी किमान वेतन कायद्यानुसार पूर्ण रक्कम कामगारांच्या बँक खात्यात वेळेवर जमा केली आहे का? तसेच कामगारांना वेतन स्लिप (Pay Slip) दिली जाते का?

सामाजिक सुरक्षा व आरोग्य: EPF व ESIC नोंदणी झाली आहे का? कामगारांना EPF चलनाची प्रत आणि काम करताना आवश्यक ती सुरक्षा/आरोग्य साधने (Safety Kit) उपलब्ध करून दिली आहेत का?

हजेरी व नोंदणी: कंत्राटी स्वच्छता कामगारांची नोंदणी, अद्ययावत हजेरी पुस्तक आणि बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते किंवा नाही.

नियमभंग झाल्यास मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Advertisement

तपासणीदरम्यान कंत्राटी कामगारांचे शोषण होत असल्याचे किंवा शासनाच्या परिपत्रकांची अंमलबजावणी न झाल्याचे आढळल्यास, संबंधित नगरपरिषद/नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव संचालनालयाकडे पाठवण्यात येईल, असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

तपासणी पथके आणि नगरपरिषद/नगरपंचायतनिहाय वेळापत्रक असे

पथक प्रमुख (सरकारी कामगार अधिकारी) समाविष्ट सदस्यांची नावे तपासणीचे ठिकाण व दिनांक

तुषार बोरसे (पथक १) किरण आहेर, विशाल जोगी मनमाड (२५ ऑग), सिन्नर (२ सप्टें), ओझर (३ सप्टें), पिंपळगाव (८ सप्टें)

दिनेश पाटोळे (पथक २) मुकुंद शिंदे, विशाल पाटील येवला (२५ ऑग), त्र्यंबक (२ सप्टें), नांदगाव (३ सप्टें), भगूर (८ सप्टें)

उदय सयुवंशी (पथक ३) सनी सयुवंशी, राकेश जाधव सटाणा (२५ ऑग), इगतपुरी (२ सप्टें), चांदवड (३ सप्टें), देवळा (८ सप्टें)

विजय पुकळे (पथक ४) ज्ञानेश्वर दिंघोळे, भूषण कापसे सुरगाणा (२५ ऑग), कळवण (२ सप्टें), पेठ (३ सप्टें), दिंडोरी (८ सप्टें), निफाड (९ सप्टें)

कामगार हक्कांसंबंधी किंवा तक्रारींसाठी नागरिक भारत सरकारच्या Chief Labour Commissioner (Central) या अधिकृत पोर्टलवरही नियमावली पाहू शकतात.

Advertisement

Comments

No comments yet.