‘शिवम’ बंगल्यात फिटनेसच्या आडून देहविक्रीचा काळा धंदा... नाशिक पोलिसांचा छापा, महिलेची सुटका...

Share:
Main Image
Last updated: 20-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० ऑगस्ट - शहरातील मुंबईनाका परिसरातील एका बंगल्यात फिटनेस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्याचा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून दोन जणांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधवनगर, श्रीहरी कुटे मार्ग, मुंबईनाका येथील ‘शिवम’ नावाच्या बंगल्यामध्ये फिटनेस सेंटरच्या आडून महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंच व स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) प्रतिनिधींसह सदर बंगल्यावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान तिथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी:

संजय विजय शर्मा (रा. अशोका मार्ग, नाशिक)

Advertisement

कृष्णाकुमार सिताराम यादव (वय २६, रा. मुंबईनाका, नाशिक; मूळ रा. हजारीबाग, झारखंड)

या दोघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ आणि ५ नुसार मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन, अंमलदार व ‘विपला’ एनजीओच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.