नाशिकमध्ये महिला, अल्पवयीन मुली असुरक्षित... विनयभंगाच्या चार वेगवेगळ्या घटना...

Share:
Main Image
Last updated: 20-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० ऑगस्ट - शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह चार जणींचा विनयभंग करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी नाशिकरोड, देवळाली कॅम्प आणि अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारमधून कसारा घाटात नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पहिली घटना सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात घडली. येथे शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस तिचा मित्र यतीश देविदास जाधव (रा. साक्री, जि. धुळे) याने अनिकेत जाधव व एका मैत्रीणीच्या मदतीने बळजबरीने कारमध्ये बसवले. तिला कसारा घाटात नेऊन यतीशने तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, तसेच धमकी देऊन फोटो काढले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोक्सोसह (POCSO) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसून महिलेशी असभ्य वर्तन

Advertisement

दुसरी घटना मोरेमळा भागात घडली. निखील गोपाल कुमावत (वय ४०, रा. बालाजीनगर, मोरेमळा) या संशयिताने पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणीही नाशिकरोड पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लँडलाईन फोनवरून अश्लील शिवीगाळ

तिसरा प्रकार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. एका विवाहित महिलेला अनोळखी लँडलाईन क्रमांकावरून फोन करून, "एका व्यक्तीने घेतलेल्या कर्जासाठी तुमचा रेफरन्स दिला आहे," असे सांगत भामट्याने अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

जाब विचारणाऱ्या कुटुंबावर कुंडी फेकून मारहाण

चौथी घटना सिडकोतील पंडितनगर भागात घडली. येथील पीडितेचा सनी बोरसे व त्याच्या भावाने विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी जाब विचारला असता, संशयितांनी आई, वडील, भाऊ आणि काका यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत कुंडी फेकून मारल्याने पीडितेची आई व काका जखमी झाले आहेत. अंबड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मनीषा चव्हाण अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.