महिला वाहतूक वार्डनशी अश्लील हावभाव करत धक्काबुक्की... आयटीआय सिग्नल परिसरातील घटना...

Share:
Last updated: 20-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० ऑगस्ट - रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करणाऱ्या एका २२ वर्षीय महिला वाहतूक वार्डनशी अश्लील हावभाव करत, शिवीगाळ व धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल भागात घडली. केवळ वाहन पुढे घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी संशयित दुचाकीस्वाराविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय महिला वाहतूक वार्डन मंगळवारी (दि. १८) सकाळी त्र्यंबकरोडवरील अत्यंत गजबजलेल्या आयटीआय सिग्नल परिसरात आपली कर्तव्य पार पाडत होती. या दरम्यान रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या एक अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (क्र. MH 15 EU 8532) चालकाला तिने वाहतुकीस अडथळा होत असल्याने गाडी पुढे घेण्यास सांगितले.

Advertisement

धक्काबुक्की करत पोबारा

गाडी पुढे घेण्याचा सल्ला दिल्याने संतप्त झालेल्या संशयित तरुणाने महिला वार्डनला अश्लील हावभाव करत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने तिला धक्का देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि सातपूरच्या दिशेने पळ काढला.

पीडित महिला वार्डनच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि विनयभंगाच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दुचाकीच्या क्रमांकावरून संशयित चालकाचा शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.