विवाहितेला मारहाण अन् तोडफोड... जीवघेण्या दगडफेकीचाही प्रयत्न...

Share:
Main Image
Last updated: 19-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ ऑगस्ट - पतीसोबत असलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून दोघा भावांनी एका विवाहितेच्या घरात घुसून मारहाण करत तोडफोड केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड येथील जलतरण तलाव भागात घडली. संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने महिलेच्या दिशेने दगड फेकून मारला; मात्र तिने वेळेत प्रसंगावधान राखल्याने ती सुदैवाने बालंबाल बचावली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासह गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब मच्छींद्र वाकळे आणि मारूती मच्छींद्र वाकळे (दोघे रा. सर्व्हिस पार्क बिल्डिंगसमोर, गोदावरी कॉलनी, जयभवानी रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यासंदर्भात उज्वला सोपान कुमावत (रा. अमृतधारा हौसिंग सोसायटी, जलतरण तलावाजवळ, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

नेमका प्रकार काय?

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचा संशयित वाकळे भावांसोबत आर्थिक व्यवहार आहे. या व्यवहाराच्या थकीत पैशांवरून गेल्या बुधवारी (दि. १२) सायंकाळी दोन्ही संशयितांनी पीडितेचे घर गाठले. घरात घुसून त्यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. "तुझा नवरा कुठे आहे? तो आमचे पैसे देत नाही, त्याला आज जिवंत सोडत नाही," अशी धमकी देत त्यांनी परिसरातील दुचाकी आणि घराबाहेरील कुंड्यांची तोडफोड केली.

दगडफेकीने खळबळ

आरडाओरडा आणि तोडफोड सुरू असतानाच एका संशयिताने महिलेच्या दिशेने मोठा दगड फेकून मारला. मात्र, पीडितेने तात्काळ बाजूला होत प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची गंभीर दखल घेत उपनगर पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार झाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.