गोदावरी पात्रात बचावकार्याची ‘मॉन्सून टेस्ट’... आनंदवल्ली घाटावर झाली रंगीत तालीम...

Share:
Main Image
Last updated: 19-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १९ ऑगस्ट - महासिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीपात्रातील आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. नदीपात्रात पूर, बोट दुर्घटना किंवा अन्य आपत्ती ओढावल्यास जलद व प्रभावी बचावकार्य राबवता यावे, यासाठी नाशिकमधील आनंदवल्ली घाट येथे तात्पुरत्या जलसुविधांची ‘प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट’ (PoC) म्हणजेच ‘मॉन्सून टेस्ट’ सुरू करण्यात आली आहे.

१७ ऑगस्टपासून सुरू झालेली ही चाचणी पुढील २ ते ३ आठवडे चालणार आहे. पावसाळ्यातील तुफान प्रवाह, पाण्याची वाढती पातळी आणि बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन तात्पुरत्या सुविधांची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि टिकाऊपणा तपासणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

प्राधिकरण आयुक्तांकडून पाहणी

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी सकाळी आनंदवल्ली घाटाला भेट देऊन या चाचण्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या वेळी बोलताना ते म्हणाले, “पावसाळ्यातील प्रत्यक्ष नदीस्थितीत ही चाचणी घेण्यामागे संभाव्य आपत्तीच्या परिस्थितीत बचावकार्य किती प्रभावीपणे राबविता येईल, याची प्रत्यक्ष पडताळणी करणे हा उद्देश आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि इतर यंत्रणांच्या निरीक्षणांनुसार महासिंहस्थासाठी अधिक सक्षम आणि समन्वयित आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था उभारण्यात येईल.”

बहुविभागीय पथकांकडून संयुक्त पाहणी

Advertisement

१७ आणि १८ ऑगस्ट रोजी नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, NDRF, SDRF, जलसंपदा विभाग, कुंभमेळा प्राधिकरण आणि MSIDC यांच्या संयुक्त पथकाने नदीपात्राची पाहणी केली.

तांत्रिक मूल्यांकन: NDRF कडून नदीतील धोकादायक ठिकाणे, पाण्याचा प्रवाह आणि बचावकार्यासाठीचे महत्त्वाचे भाग अभ्यासले जात आहेत.

सुविधांची चाचणी: आपत्कालीन स्थितीत बचाव बोटींची हालचाल, सुरक्षित उतरण्या-चढण्याची ठिकाणे (जेट्टी व डॉकिंग सुविधा), तसेच बचाव पथकांसाठीचे प्रवेशमार्ग तपासले जात आहेत.

सुरक्षा साधनसामग्री: जल बॅरिकेडिंग, बचाव बोटी, लाइफ जॅकेट्स आणि लाइफ रिंग्जची उपलब्धता आणि तैनातीचा आढावा घेतला जात आहे.

या 'मॉन्सून टेस्ट'च्या माध्यमातून बचाव पथक आपत्तीच्या वेळी किती वेगाने घटनास्थळी पोहोचू शकते (Response Time), याचा प्रत्यक्ष अभ्यास केला जात आहे. या चाचणीतून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारेच महासिंहस्थ २०२७ साठी नदीपात्रातील सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेचे अंतिम तांत्रिक नियोजन केले जाणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.