नाशिकमध्ये 'भाईगिरी'चा थरार... कोयता दाखवून दोघांना मारहाण...

Share:
Main Image
Last updated: 19-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ ऑगस्ट - पार्टी करण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने दुचाकीस्वार दोन मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करत परिसरात धारदार कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवली. पेठरोडवरील मरी माता मंदिर भागात सोमवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

जय खरात, सोनू गांगुर्डे, टिंगऱ्या उर्फ जय मोरे व प्रविण शार्दुल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील खरात आणि मोरे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. याबाबत हेमंत धोंडीराम मोरे (वय २१, रा. फुलेनगर, पंचवटी) या युवकाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

नेमकी काय घडली घटना?

Advertisement

हेमंत मोरे आणि त्याचा मित्र विकास निरभवणे हे दोघे सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घराकडे जात होते. पेठरोडवरील पाटाजवळील मरी माता मंदिर परिसरात पोहोचताच या चार जणांच्या टोळक्याने त्यांची दुचाकी अडवली. त्यांनी दोघा मित्रांकडे पार्टी करण्यासाठी पैशांची मागणी केली. मोरे याने 'पैसे नाहीत' असे सांगताच संतप्त झालेल्या संशयितांनी दोघांना गाडीवरून खाली उतरवून त्यांची अंगझडती घेतली. खिशात पैसे न आढळल्याने टोळक्याने त्यांना लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.

हातात कोयता अन् 'भाईगिरी'...

मारहाणीदरम्यान संशयित जय खरात याने त्याच्या कमरेला लावलेला लोखंडी कोयता बाहेर काढून हवेत फिरवत, "आम्ही या भागातील भाई आहोत," असे म्हणत परिसरात मोठा आरडाओरडा केला. धारदार शस्त्र पाहून परिसरात एकच पळापळ झाली. नागरिकांनी भीतीपोटी घराचे दरवाजे बंद करून घेतले, तर दोन्ही मित्रांनीही तेथून पळ काढून जीव वाचवला.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तीव्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस हवालदार सानप हे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.