नाशिक, (प्रतिनिधी) १७ ऑगस्ट - गेल्या दीड दशकाहून अधिक काळ चाललेल्या ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चा अत्यंत भयानक आणि रक्ताळलेला शेवट नाशिकमध्ये समोर आला आहे. नव्या तरुणासोबत जुळलेल्या अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या जुन्या लिव्ह-इन जोडीदाराचा घरातच धारदार चाकूने गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून अर्टिगा कारमधून नेऊन कसारा घाटातील घनदाट जंगलात फेकून देण्यात आला होता. इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने या थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश करत संशयित महिला, तिचा प्रियकर आणि मृतदेहाची विल्हेवाट लावणारे दोन साथीदार अशा चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
वसंत गोरखनाथ सातपुते (वय ४०, रा. स्वराज्यानगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे निर्घृण खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चालकाच्या संशयाने फुटले गुन्हेगारीचे बिंग
वसंत सातपुते हे गेल्या १५ ते १६ वर्षांपासून संशयित हसीना हबीब शेख (वय ४४) हिच्यासोबत स्वराज्यानगर परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. सातपुते हे ५ ऑगस्टपासून अचानक घरातून बेपत्ता झाले. अनेक वर्षे चालक म्हणून काम पाहणारे कचरू कडवे (रा. पेठ रोड) यांनी मालक दिसत नसल्याने हसीनाकडे सातत्याने विचारणा केली; मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर जोडीदार गायब असतानाही तिने पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला व उलट चालकालाच ‘माझ्याविरोधात तक्रार कर’ असे आव्हान दिले. या संशयास्पद वागणुकीवरून चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सीबीएस परिसरातून आवळल्या मुसक्या
गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना पोलीस हवालदार नाझीमखान पठाण व अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. अपहृत वसंत सातपुते यांचा हसीना शेख व तिचा प्रियकर साहिल शाह यांनी साथीदारांच्या मदतीने काटा काढला असून ते शालीमार परिसरात वावरत असल्याचे स्पष्ट झाले. साहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. आंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीबीएस परिसरात सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले संशयित:
हसीना हबीब शेख (वय ४४, रा. स्वराज्यानगर, पाथर्डी फाटा, नाशिक)
साहिल रफिक शाह (वय २३, रा. म्हाडा वसाहत, वडाळा गाव, नाशिक)
मोईन मुक्तार शाह (वय २४, रा. नाईकवाडी पुरा, भद्रकाली, जुने नाशिक)
सरफराज अब्रार सय्यद (वय २२, रा. नानावली, गुमशाबाबा चौक, जुने नाशिक)
मध्यरात्री गळा चिरला; पहाटे कसारा घाटात विल्हेवाट
पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी खुनाची कबुली दिली. हसीना शेख आणि तिच्यापेक्षा वयाने निम्मा असलेला साहिल शाह यांच्यातील प्रेमसंबंधांत वसंत सातपुते वारंवार अडथळा ठरत होते. त्यामुळे त्यांचा कायमचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. ६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरातच साहिल शाहच्या मदतीने चाकूने सातपुते यांचा गळा चिरून खून करण्यात आला. त्यानंतर साहिलचे मित्र मोईन शाह आणि सरफराज सय्यद यांना पाचारण करून मृतदेह गोणीत भरला आणि अर्टिगा कारने नेऊन कसारा घाटातील दरीत फेकून दिला.
शोधमोहिमेत दरीतून मृतदेह हस्तगत
गुन्ह्याची कबुली मिळताच पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक रमीझ शेख व पथकाने कसारा घाटातील दुर्गम व घनदाट जंगलात शोधमोहीम राबवून गोणीत बांधलेला वसंत सातपुते यांचा मृतदेह शोधून काढला. मृतदेह इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ पुढील तपास करत आहेत.
तपास पथकाची कामगिरी:
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, साहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. आंचल मुद्गल, सपोनि जया तारडे, पोउपनि चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोते, रमीझ शेख, श्रेणी पोउपनि किरण शिरसाठ, अंमलदार नाझीमखान पठाण, मुक्तार शेख, संदीप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, आप्पा पानवळ, उत्तम पवार, अमोल कोष्टी, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, देविदास ठाकरे, मनिषा सरोदे, अनुजा येलवे, राहुल पालखेडे, महेश साळुंके, रोहिदास लिलके, शर्मिला कोकणी, गोरक्ष साबळे, कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, श्रीकांत सूर्यवंशी व चालक पथकाने केली.