नाशिकमध्ये दुर्दैवी दुर्घटना... पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 17-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ ऑगस्ट - म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील नवीन अयोध्या नगरी परिसरात एका दुर्दैवी घटनेत घराच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

तृप्ती विशाल सोनवणे (वय ८ वर्षे) आणि स्वास्ती विशाल सोनवणे (वय ४ वर्षे, दोन्ही रा. शुभम कॉलनी, नवीन अयोध्या नगरी, माननगर, नाशिक) असे मृत पावलेल्या सख्या बहिणींचे नाव आहे.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:०० ते १०:३५ वाजेच्या सुमारास या दोन्ही बालिका खेळता खेळता किंवा अन्य कारणाने स्वतःच्या राहत्या घराच्या पाण्याच्या टाकीमध्ये पडल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांचे शेजारी राहणारे अमोल पोतदार यांनी तातडीने दोन्ही मुलींना बेशुद्धावस्थेत रात्री १०:३५ वाजता उपचारासाठी अपोलो हॉस्पिटल, नाशिक येथे दाखल केले. मात्र, अपोलो हॉस्पिटलचे डॉ. सागर सोनवणे यांनी तपासणी केल्यानंतर रात्री ११:१० वाजता दोन्ही मुलींना मृत घोषित केले.

या प्रकरणी अपोलो हॉस्पिटलमधील डाॅक्टरांच्या माहितीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (अ.मृ.रजि. क्र. १०१/२०२६) नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार खराटे करत आहेत. एकाच घरातील दोन चिमुकल्या बहिणींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.