नाशिक, (प्रतिनिधी) १६ ऑगस्ट - शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील विविध प्रकारची १० लाख रुपयांपर्यंतची कामे बेरोजगारांच्या नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थांना विना निविदा (Without Tender) देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामांच्या वाटपासाठी नाशिक जिल्हास्तरीय काम वाटप समितीकडून जिल्ह्यातील कार्यरत व इच्छुक सेवा सहकारी संस्थांकडून २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि. रा. रिसे यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.
प्रस्तावासोबत जोडायची महत्त्वाची कागदपत्रे:
नोंदणी प्रमाणपत्र: ऑगस्ट २००० नंतर स्थापना झाल्याचे सहकार कायदा १९६० अंतर्गत प्रमाणपत्र.
लेखापरीक्षण अहवाल: मागील दोन आर्थिक वर्षांचे ऑडिट रिपोर्ट (Shadow Copies).
सभासद यादी: सर्व सभासदांच्या चालू सेवायोजन (Employment) कार्डसह अद्ययावत यादी.
इतर कागदपत्रे: संस्थेचे उपविधी, किमान सहा महिने कार्यरत असल्याचा पुरावा, बँक पासबुक व मागील वर्षाचे बँक खात्याचे स्टेटमेंट.
कामांचा अनुभव व तपशील: यापूर्वी केलेल्या कामांची यादी तसेच चालू आर्थिक वर्षात मिळालेल्या कामांची माहिती.
अर्ज सादर करण्याची पद्धत व मुदत
इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव विहित नमुन्यात २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.
ऑनलाइन माध्यम: nashikrojgar@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.
ऑफलाइन माध्यम: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात थेट जमा करावेत.