सीसीटीव्ही, वायरलेस अन् अलर्ट सिस्टीम... नाशिक पोलिसांच्या ताफ्यात आल्या या आधुनिक 'स्मार्ट व्हॅन'...

Share:
Main Image
Last updated: 16-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १६ ऑगस्ट - नाशिक पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत आणि गतीशीलतेत भर घालण्यासाठी ५ अत्याधुनिक 'वन मोबाईल व्हॅन' दाखल झाल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस उपायुक्त किशोर काळे, चंद्रकांत दळवी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अत्याधुनिक 'गतिशील नियंत्रण केंद्र'

ही 'वन मोबाईल व्हॅन' पोलीस दलासाठी प्रत्यक्ष घटनास्थळावरील गतिशील नियंत्रण व समन्वय केंद्र (Mobile Control & Coordination Unit) म्हणून काम करणार आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात आयोजित होणारे मोठे धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम, गर्दी नियंत्रण, बंदोबस्त आणि अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जलद प्रतिसाद (Quick Response) देण्यासाठी ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील.

वाहनातील प्रमुख सुविधा:

Advertisement

संवाद व संपर्क यंत्रणा: वायरलेस सेट, VHF कम्युनिकेशन प्रणाली, मोबाईल फोन आणि हाय-स्पीड डेटा कम्युनिकेशन व्यवस्था.

सुरक्षा व उद्घोषणा: सायरन, फ्लॅशर आणि सार्वजनिक उद्घोषणा (PA System) प्रणाली, ज्यामुळे घटनास्थळी नागरिकांना तातडीने सूचना देणे शक्य होईल.

निरीक्षण व रेकॉर्डिंग: गर्दीवर व संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे आणि थेट रेकॉर्डिंगची सुविधा.

इतर सोयी: वीजपुरवठ्यासाठी इनव्हर्टर, बॅटरी व जनरेटर बॅकअपसह प्रथमोपचार पेटी (First-Aid Kit) आणि आवश्यक आपत्कालीन सुरक्षा साहित्य.

या अत्याधुनिक वाहनांमुळे पोलीस दलाला कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि घटनास्थळी वेळेत पोहोचून प्रभावी कारवाई करणे अधिक सुलभ होणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.