श्रावण सोमवारनिमित्त नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल...

Share:
Main Image
Last updated: 16-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १६ ऑगस्ट -  श्रावण महिन्यातील सोमवार तसेच त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या श्रावण सोमवारी अंदाजे 1 ते 1.50 लाख, तर तिसऱ्या सोमवारी अर्थात गर्दीच्या दिवशी सुमारे 4 ते 4.50 लाख भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वाहतूक नियमन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम सुरू असून काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नियमित वाहतूक आणि भाविकांची वाहने एकाच मार्गावर आल्यास वाहतूक कोंडी तसेच अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्याकडून दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी वाहतूक नियमनाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

वाहतूक नियमनाचा कालावधी

पहिला श्रावण सोमवार : रविवार दि. 16 ऑगस्ट 2026 सकाळी 6 ते सोमवार दि. 17 ऑगस्ट 2026 रात्री 8 वाजेपर्यंत.

दुसरा श्रावण सोमवार : शनिवार दि. 22 ऑगस्ट 2026 सकाळी 6 ते सोमवार दि. 24 ऑगस्ट 2026 रात्री 8 वाजेपर्यंत.

तिसरा श्रावण सोमवार : शनिवार दि. 29 ऑगस्ट 2026 सकाळी 6 ते सोमवार दि. 31 ऑगस्ट 2026 रात्री 8 वाजेपर्यंत.

चौथा श्रावण सोमवार : शनिवार दि. 5 सप्टेंबर 2026 सकाळी 6 ते सोमवार दि. 7 सप्टेंबर 2026 रात्री 8 वाजेपर्यंत.

जव्हार, मोखाडा, पालघरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने

नाशिककडून जव्हार, मोखाडा, पालघरकडे जाणारी तसेच या भागातून नाशिककडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. 

Advertisement

नाशिक → गोवर्धन → गिरणारे → धोंडेगाव → देवरगाव → वाघेरा फाटा → आंबोली फाटा → जव्हार या मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल. जव्हारकडून नाशिककडे येणारी वाहतूक याच मार्गाने उलट दिशेने राहील.

त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांना प्रवेशबंदी

त्र्यंबकेश्वर शहरातील वाहनतळाची क्षमता अपुरी असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील खासगी वाहने शहरात न नेता खंबाळे येथील बाह्य वाहनतळावर थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे कार, टॅक्सी, रिक्षा, चारचाकी आदी खासगी वाहनांनी त्र्यंबकेश्वर शहरात न जाता ख॔बाळे येथील बाह्य वाहनतळाचा वापर करावा.

ख॔बाळे येथून भाविकांच्या पुढील वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार एस.टी. महामंडळाच्या अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भाविकांची पुढील वाहतूक एस.टी. बसेसद्वारे करण्यात येईल.

अत्यावश्यक व स्थानिक वाहने वगळली

एस.टी. महामंडळाच्या नियमित बसेस, शालेय व महाविद्यालयीन वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने, अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेतील वाहने तसेच ओळखपत्र सादर करणाऱ्या स्थानिक रहिवाशांची वाहने या वाहतूक नियमनातून वगळण्यात आली आहेत.

भाविक व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

कायदा व सुव्यवस्था तसेच आपत्कालीन सेवा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व भाविक व वाहनधारकांनी वाहतूक नियमनाचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. गर्दीचा कालावधी लक्षात घेता संभाव्य गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, हृदयरोगी, गर्भवती माता, स्तनदा माता तसेच लहान मुलांनी या कालावधीत त्र्यंबकेश्वरला येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भाविकांच्या गैरसोयी अथवा तक्रारींच्या निवारणासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक स्थानिक प्रशासनामार्फत जाहीर करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.