स्कॉलरशिप परीक्षेत नाशिक जिल्ह्याची उत्तुंग भरारी... चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांचे...

Share:
Main Image
Last updated: 15-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १५ ऑगस्ट - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी (प्राथमिक) आणि इयत्ता सातवी (उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात नाशिक जिल्ह्याने भरीव यश संपादन केले आहे. मागील परीक्षेच्या तुलनेत यंदा इयत्ता चौथीच्या पात्रतेच्या प्रमाणात ६१.४७ टक्के, तर इयत्ता सातवीच्या पात्रतेच्या प्रमाणात ५६.१५ टक्के इतकी घवघवीत वाढ झाली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

‘मिशन स्कॉलर नाशिक’ ठरले यशोगाथा

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि राज्य पातळीवरील गुणवत्ता यादीत नाशिकच्या विद्यार्थ्यांचा डंका वाजवण्यासाठी जिल्ह्यात ‘मिशन स्कॉलर नाशिक’ हा विशेष उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमांतर्गत नियोजनबद्ध तयारी करून घेतली जात आहे.

भावी परीक्षेसाठी आखले 'हे' विशेष नियोजन:

Advertisement

७ ऑफलाइन सराव चाचण्या: मुख्य परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांचा सराव व्हावा म्हणून ७ ऑफलाइन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

फी मधून सुटका (Z-P सेस निधी): विद्यार्थ्यांचा आर्थिक भार हलका करण्यासाठी जिल्हा परिषद सेस निधीतून शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरले जाईल.

आधुनिक मोबाईल ॲप: स्व-अध्ययन आणि सराव प्रश्नपत्रिकांसाठी विशेष मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सराव वर्ग व कार्यशाळा: जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत सराव वर्ग आणि शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शक कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे.

आगामी २०२६-२७ च्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देण्याचा मानस शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.