दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १५ ऑगस्ट - नाशिकच्या मातीतील कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा जागतिक पातळीवर नाशिकची मान अभिमानाने उंचवली आहे. नाशिकचे सुपुत्र अभिनेता अभिजित खांडकेकर आणि नाशिकचीच कन्या अभिनेत्री अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली लोकप्रिय मराठी मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' आता थेट दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालत आहे. ही मालिका तिथे स्थानिक isiZulu भाषेत डब होऊन प्रसारित होत असून, तिथल्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
२२ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने साडेचार वर्षांत १३५० हून अधिक भागांचा टप्पा पार केला. महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली ही कथा आता Zee Zonke, Zee One आणि Zee World या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरून दक्षिण आफ्रिकेतील घराघरांत पोहोचली आहे.
जॉहान्सबर्ग आणि डर्बनमध्ये नाशिकच्या कलाकारांचे जोरदार स्वागत
या आंतरराष्ट्रीय यशाच्या पार्श्वभूमीवर अभिजित खांडकेकर, अनिता दाते (राधिका) आणि 'पारू' मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणे यांनी नुकताच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. जॉहान्सबर्ग आणि डर्बन येथील चाहत्यांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. परदेशी भूमीत आपल्या नाशिककर कलाकारांवर आणि मराठी कथेवर तिथल्या प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला.
"नाशिकच्या कलाकारांची कथा आता जगभराची झाली" – अभिजित खांडकेकर
दक्षिण आफ्रिकेतील या भावूक अनुभवाबद्दल बोलताना अभिजित खांडकेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या:
"काही कथा फक्त सांगितल्या जात नाहीत, तर त्या जगल्या जातात. आपली मराठी मालिका तिथे isiZulu भाषेत डब होऊन चालते आणि तिचे रिपीट टेलिकास्ट होतात, हे प्रत्यक्ष पाहणे अत्यंत अविस्मरणीय होते. आपल्या भाषेतील कथा आणि आपली पात्रे इतक्या दूरवर कुणाच्या तरी आयुष्याचा भाग बनली आहेत, हे अनुभवताना मन भरून आले. कथा कधीच फक्त आपली राहत नाही; ती प्रवास करते आणि शेवटी प्रत्येकाची होते."
या प्रवासाबद्दल अभिजित यांनी मालिकेचे निर्माते तेजेंद्र नेसवणकर, सुवर्णा मंती, लेखक-दिग्दर्शक, संपूर्ण क्रिएटिव्ह टीम आणि आफ्रिकेतील चाहत्यांचे आभार मानले. नाशिकच्या दोन मुख्य कलाकारांनी मिळवून दिलेल्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल संपूर्ण नाशिक शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.