मनोहर शिंदे, (नाशिक) १६ ऑगस्ट - द्वारका सर्कल येथील उड्डाणपूल व इंटरचेंजच्या महत्त्वपूर्ण कामासाठी ५०० मी.मी. व्यासाच्या गुरुत्ववाहिनीचे क्रॉस-कनेक्शन करणे आणि शहरातील विविध भागांतील अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामांसाठी मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, अशी माहिती नाशिक महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
पाणीपुरवठा बंद राहण्याचे मुख्य कारण:
द्वार्का सर्कल इंटरचेंज काम: मुंबई-धुळे मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल येथे 'इपीसी' (EPC) मोडवर सुरू असलेल्या कामात अडथळा ठरणारी ५०० मी.मी. गुरुत्ववाहिनी पूर्ववत जोडण्यासाठी (Cross-Connection) MSIDC कडून १२ तासांचा Shutdown घेण्यात येत आहे. कुंभ आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या संयुक्त पाहणीनंतर या कामास प्राधान्य देण्यात आले आहे.
इतर शहरातील १७ अत्यावश्यक कामे: या शटडाऊनच्या कालावधीत महापालिकेतर्फे नाशिक पूर्व, नवीन नाशिक, नाशिक रोड, पंचवटी आणि सातपूर विभागातील एकूण १७ जलकुंभ, व्हॉल्व्ह दुरुस्ती, लिकेज काढणे आणि पाईपलाईन जोडणीची महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.
प्रमुख विभागीय कामे:
नाशिक पूर्व व नाशिक रोड: गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात ७०० मी.मी. रॉ वॉटर पाईपलाईनवर व्हॉल्व्ह बसवणे, विहीतगाव नवीन जलकुंभासाठी क्रॉस-कनेक्शन करणे, कल्पतरू नगर आणि चढाव पार्क जलकुंभांवरील व्हॉल्व्ह दुरुस्ती.
नवीन नाशिक: भवानी माता जलकुंभाचे व्हॉल्व्ह दुरुस्ती आणि आर.डी. सर्कल येथे ४५० मी.मी. पाईपलाईनचे लिकेज काढणे.
सातपूर व पंचवटी: पपया नर्सरी चौकात १२\०० मी.मी. x ६०० मी.मी. पाईपलाईन क्रॉस-कनेक्शन, अशोक नगर जलकुंभासाठी नवीन पाईपलाईन जोडणे आणि धु्रवनगर येथे पीएससी पाईपलाईन लिकेज बंद करणे.
नागरिकांना आवाहन:
मंगळवारचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने आणि बुधवारी सकाळी कमी दाबाने पाणी येणार असल्याने नाशिक शहरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.