नाशिक, (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट - शहरात अपघातांची मालिका सुरूच असून वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन दुर्दैवी घटनांमध्ये वृद्धासह दोघा पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी (सातपूर) पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा तर सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महामार्ग ओलांडताना ट्रकच्या धडकेत वृद्धेचा अंत
पहिली घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील लोकमत कार्यालयाजवळ घडली. मुळच्या एरंडेश्वर (ता. पूर्ण, जि. परभणी) येथील रहिवासी असलेल्या वंदना मेसाजी सूर्यवंशी (वय ७८) या मंगळवारी (दि. ११) रात्री पतीसमवेत रस्ता ओलांडत होत्या. यावेळी मुंबईकडून भरधाव येणाऱ्या मालट्रकने (एमएच १५ इजी ७४००) त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वंदना सूर्यवंशी यांना उपचारासाठी रेडिअंट प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉ. सचिन विभांडीक यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पती मेसाजी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक तुषार डेफले याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पठाण तपास करत आहेत.
अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
दुसरी घटना व्हिक्टर पॉईंट परिसरात घडली. सातपूर राजवाडा येथील रहिवासी दिलीप दामोदर काळे (वय ५४) हे २० जून रोजी रात्री व्हिक्टर पॉईंटकडून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने पत्नी कांता काळे यांनी त्यांना आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र, बुधवारी (दि. १२) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, हवालदार बेंडकुळे पुढील तपास करत आहेत.