अल्पवयीन मुलीचा पाठलाग... घरात घुसून छेडछाड... नाशकात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर...

Share:
Main Image
Last updated: 14-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट - शहरात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, वेगवेगळ्या तीन भागांत परिचित आणि संशयितांकडून तिघींचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आले आहे. यात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून धमकी देण्याच्या प्रकाराचाही समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात 'पोक्सो'सह (POCSO) विनयभंगाचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी

पहिली घटना एकलहरा परिसरातील ओढा रोडवर घडली. आजारी असल्याने शिकवणी आटोपून रुग्णालयात गेलेली अल्पवयीन मुलगी रात्री आठ वाजेच्या सुमारास पायी घराकडे जात होती. त्यावेळी करण विजू खांडेकर (रा. पेंढारवस्ती, शिवाजीवाडी) या युवकाने तिचा पाठलाग करत वाट अडवली आणि विनयभंग केला. मुलीने प्रतिकार केला असता संशयिताने तिला घरातून उचलून नेण्याची तसेच आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे पुढील तपास करत आहेत.

दारूच्या नशेत घरात घुसून छेडछाड

Advertisement

दुसरी घटना वडाळागाव येथील इम्तियाज गोडाऊन भागात घडली. संशयित मोईन शहा याने दारूच्या नशेत आपल्या पत्नी आणि मुलासह पीडितेच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. त्याने पीडित महिलेसह तिच्या वडिलांना शिवीगाळ व मारहाण करत महिलेचा विनयभंग केला.

विवाहितेची वाट अडवून दमदाटी

तिसरी घटना चेतना नगर परिसरात घडली. पीडित विवाहिता भाजीपाला खरेदीसाठी इमारतीखाली उतरली असता, मोबाईलच्या माध्यमातून नियमित पाठलाग करणाऱ्या राहुल रोकडे या संशयिताने तिची वाट अडवली. "मला तुझ्याशी बोलायचे आहे" असे म्हणत त्याने विवाहितेचा विनयभंग केला. पीडितेने विरोध दर्शवताच संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करत तेथून पोबारा केला.

इंदिरानगर पोलीस ठाण्यात या दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार पारणकर आणि पगारे या प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.