एस.के. खेडकर, (नाशिक) १४ ऑगस्ट - श्रावण महिन्यानिमित्त पंचवटीतील प्रसिद्ध श्री कपालेश्वर मंदिर आणि पवित्र रामकुंड, गंगाघाट परिसरात होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता नाशिक शहर पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रावणातील सर्व सोमवार आणि शनिवारी या परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून, सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मुख्य ४ मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ (नो एंट्री) करण्यात आला आहे.
नागरिक व वाहनचालकांनी या निर्बंधांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.
'नो एंट्री' असणारे दिवस (सकाळी ६ ते रात्री १०)
श्रावण सोमवार: १७ ऑगस्ट, २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर २०२६
श्रावण शनिवार: १५ ऑगस्ट, २२ ऑगस्ट, २९ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर २०२६
'हे' ४ मार्ग राहतील पूर्णपणे बंद:
१. मालेगाव स्टँड कडून श्री कपालेश्वर मंदिराकडे (रामकुंड) येणारा मार्ग.
२. खांदवे सभागृह कडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग.
३. सरदार चौक कडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग.
४. ढिकले वाचनालय कडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग.
अत्यावश्यक सेवांना सवलत
वाहतूक कोंडी टाळणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, या काळात पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि शववाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना या निर्बंधातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.