एस.के. खेडकर, (नाशिक) १४ ऑगस्ट - उत्तर महाराष्ट्रातील मालेगावसह लगतच्या ६ तालुक्यांमधील माजी सैनिक, वीरनारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम व तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी मालेगाव येथे स्वतंत्र 'ईसीएचएस' (ECHS - Ex-Servicemen Contributory Health Scheme) पॉलीक्लिनिक सुरू करण्यात यावे, अशी आग्रही मागणी मालेगाव तालुका माजी सैनिक संघाच्या वतीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या मालेगाव आणि परिसरातील माजी सैनिकांना आरोग्य सेवा व उपचारांसाठी तब्बल १०० ते १५० किलोमीटरचे अंतर पार करून देवळाली (नाशिक) येथील पॉलीक्लिनिकवर अवलंबून राहावे लागत आहे. वाढते वय, आजारपण आणि प्रवासाचा त्रास यामुळे माजी सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे हाल होत आहेत.
४८ हजारांहून अधिक लाभार्थी देवळालीवर अवलंबून
परिसरातील परिस्थिती पाहता, मालेगाव, नांदगाव, देवळा, सटाणा (बागलाण), कळवण आणि चांदवड या तालुक्यांमध्ये १२,०५१ हून अधिक माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी व कुटुंबीय नोंदणीकृत आहेत. सरासरी ४ सदस्यांचे कुटुंब गृहीत धरल्यास तब्बल ४८,२०४ लाभार्थी या परिसरामध्ये आहेत.
तालुकानिहाय अंतर आणि लाभार्थ्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
मालेगाव: देवळालीपासून १३५ किमी (२,८४४ लाभार्थी)
नांदगाव: देवळालीपासून १५० किमी (२,२१२ लाभार्थी)
देवळा: देवळालीपासून १०० किमी (८४८ लाभार्थी)
सटाणा: देवळालीपासून १२० किमी (१,८३६ लाभार्थी)
कळवण: देवळालीपासून १०० किमी (१,३६० लाभार्थी)
चांदवड: देवळालीपासून १०० किमी (२,२२८ लाभार्थी)
मालेगावात सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध
संघाने निवेदनात नमूद केले आहे की, मालेगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची पुरेशी जागा उपलब्ध आहे. तसेच शहरात अनेक अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स कार्यरत असून, ते 'ईसीएचएस' अंतर्गत पॅनेलवर येण्यास तयार आहेत. त्यामुळे प्रशासनाला येथे नवीन केंद्र उभारण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
"देशाच्या सीमेवर आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांना आणि वीरपत्नींना उतारवयात केवळ औषधोपचार व तपासणीसाठी १५० किमीची धावपळ करावी लागणे क्लेशदायक आहे. मालेगावात पॉलीक्लिनिक झाल्यास ६ तालुक्यांतील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल."
— रमेश किसन सावंत (अध्यक्ष / सुभेदार मेजर सेवानिवृत्त, मालेगाव तालुका माजी सैनिक संघ)
५ वर्षांपासून पाठपुरावा सुरू
साडेपाच वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सैनिक कल्याण विभाग (पुणे) व स्टेशन हेडक्वॉर्टर देवळाली यांच्याकडेही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरात लवकर यावर सकारात्मक निर्णय घेऊन मालेगाव येथे ईसीएचएस केंद्र मंजूर करावे, अशी मागणी निवेदनावर अध्यक्ष रमेश सावंत, उपाध्यक्ष निंभा निकम, जनरल सेक्रेटरी दिलीप हिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.