कुंभमेळ्यानिमित्त गणेश मंडळांची लॉटरी... १५ लाखांची पारितोषिके...

Share:
Main Image
Last updated: 14-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १४ ऑगस्ट - २०२७ मध्ये होणाऱ्या महासिंहस्थ कुंभमेळ्याची पूर्वतयारी म्हणून गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्यापक लोकजागृती करण्याची अनोखी संकल्पना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पुढे आणली आहे. याअंतर्गत ‘महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धा’ आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, गणेश मंडळांना या महासोहळ्याच्या जनजागृतीचे आणि नागरिक सहभागाचे मुख्य केंद्र बनविले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शहर व जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीला नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार योगेश चंद्रे आणि विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेची प्रमुख वैशिष्‍ट्ये आणि ७ संकल्पना

या प्रस्तावित स्पर्धेत मंडळांना महासिंहस्थचे अध्यात्म, संस्कृती, पर्यावरण आणि आधुनिकता या विषयांवर आधारित देखावे, सजावट व सामाजिक उपक्रम राबवावे लागतील. यासाठी सात प्रमुख विषय निश्चित करण्यात आले आहेत:

कुंभाचे अध्यात्मिक महत्त्व व अमृत

नाशिक-त्र्यंबकेश्वरचा समृद्ध वारसा

भविष्यासाठी सज्ज महासिंहस्थ

हरित व शाश्वत कुंभ

Advertisement

सर्वसमावेशक कुंभ

 सेवा व समर्पण

 नाशिक – आध्यात्मिक राजधानी

खर्चापेक्षा कल्पकतेला प्राधान्य; रु. १५ लाखांची पारितोषिके

या उपक्रमात केवळ मोठ्या किंवा खर्चिक सजावटींना प्राधान्य न देता कल्पकता, नागरिकांचा सहभाग आणि शाश्वततेला महत्त्व दिले जाईल. त्यामुळे लहान मंडळांनाही यात समान संधी मिळणार आहे.

स्पर्धेत ५ प्रमुख श्रेणी ठेवण्यात आल्या असून प्रत्येक श्रेणीतील विजेत्याला ₹२ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. तसेच नावीन्यपूर्ण संकल्पनेसाठी परीक्षक मंडळाचा ₹५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार प्रस्तावित आहे.

नाव नोंदणीची मुदत १० सप्टेंबर

गणेश मंडळांच्या सूचनांनुसार या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जात असून, सहभागी होण्यासाठी १० सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. मंडळांना माहितीपर साधने आणि मार्गदर्शक सत्रेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.