अक्षय काळे, (मुंबई) १४ ऑगस्ट - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
१२ ऑगस्टपर्यंत राज्यातील तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे प्रत्यक्ष सक्रिय (Active) झाली आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
१ सप्टेंबरपासून 'या' प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य!
एसटी महामंडळाने तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे.
येत्या १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीचा प्रवास करण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर जवळच्या आगारात जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
१५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार कार्ड!
येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीची विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी इतर कोणत्याही ठिकाणी अथवा अनधिकृत केंद्रांवर नोंदणी करू नये, असे स्पष्ट आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
कार्ड कुठे मिळवाल आणि कसे रिचार्ज कराल?
प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड:
अधिकृत एसटी आगार (Depot)
बस स्थानके (Bus Stand)
अधिकृत एजंट नेटवर्क
या माध्यमातून मिळवता येईल. तसेच याच केंद्रांवर कार्ड रिचार्ज करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
"एसटी ही महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या 'लालपरी'चा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. NCMC कार्डला मिळालेला प्रतिसाद हा प्रवाशांचा या परिवर्तनावरील विश्वास दर्शवतो. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल."
— प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, एसटी महामंडळ)