नाशिक, (प्रतिनिधी) १३ ऑगस्ट - अंबड एमआयडीसी परिसरातील केवल पार्क भागातील एका कारखान्यात हातात धारदार कोयते आणि तलवारी घेऊन शिरलेल्या सशस्त्र टोळक्याने पैशांच्या मागणीवरून तुफान धुडगूस घातला. खंडणी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने कारखान्याचे व्यवस्थापक आणि कामगारांवर प्राणघातक हल्ला चढवला. या घटनेत व्यवस्थापकासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. संशयितांनी बळजबरीने रोकड लुटून वाहनाचीही तोडफोड केली. या खळबळजनक प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
प्रथमेश दिनेश साळी (रा. खुटवडनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, केवळ पार्क भागात त्यांचा ‘प्रवेद इंडस्ट्रीज’ नावाचा कारखाना आहे. बुधवारी (दि. १२) सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने हातात कोयते व तलवारी घेऊन बेकायदेशीरपणे कारखान्यात प्रवेश केला.
कारखान्यात शिरताच टोळक्याने कामगारांना अर्वाच्च शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी दिली आणि दोन हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, कामगारांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
मध्यस्थी करणाऱ्या व्यवस्थापकासह कामगारांवर हल्ला
पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या टोळक्याने थेट हिंसाचाराचा मार्ग अवलंबला. परिस्थिती सावरण्यासाठी व टोळक्याला समजून सांगण्यासाठी पुढे आलेले कारखान्याचे व्यवस्थापक विनोद पाथरे यांच्यासह कामगार आनंद कुमार, प्रकाश कुमार आणि रोहित यांच्यावर संशयितांनी कोयते व तलवारीने प्राणघातक हल्ला चढवला.
यादरम्यान टोळक्याने फिर्यादी साळी यांच्याकडून बळजबरीने १,५०० रुपयांची रोकड काढून घेतली.
बाहेर उभा असलेला वाहनाचा चालकही जखमी; वाहनाची तोडफोड
लुटमार केल्यानंतर पळून जात असताना भामट्यांनी कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या 'छोटा हत्ती' (क्र. MH 15 GV 3974) या वाहनावर तलवारीने वार करून मोठे नुकसान केले. ही तोडफोड रोखण्यासाठी पुढे आलेल्या वाहनचालकावरही टोळक्याने चाकूने वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात व्यवस्थापक, कामगार आणि वाहनचालक असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
६ जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांकडून शोध सुरू
याप्रकरणी अमर खडांगळे, आदित्य मंडलिक, आदित्य राव आणि त्यांच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरदिवसा उद्योगाच्या ठिकाणी झालेल्या या सशस्त्र हल्ल्यामुळे अंबड एमआयडीसी परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अशा गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस उपनिरीक्षक लाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.