नाशिकमध्ये गुंडगिरीचा थरार... दोन रिक्षाचालकांवर चॉपर अन् कोयत्याने जीवघेणे हल्ले...

Share:
Main Image
Last updated: 13-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ ऑगस्ट - शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून आणि जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षाचालकांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणे हल्ले करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यांमध्ये दोघे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांनी रिक्षांचीही तोडफोड केली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. शरणपूर रोडवर टोळक्याचा चॉपरने हल्ला; रिक्षाची तोडफोड

पहिली घटना शरणपूर रोडवरील राजदूत हॉटेलजवळील रिक्षा थांब्यावर घडली. जगदिश अशोक गायकवाड (वय २८, रा. ख्रिश्चनवाडी) हे बुधवारी (दि. १२) रात्री आपल्या रिक्षात बसून प्रवाशांची प्रतीक्षा करत होते.

त्याच वेळी संशयित सुऱ्या हुड्डी, सोनू, नरेश आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदार तेथे आले. "आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करतो काय?" असे म्हणत सुऱ्या हुड्डी याने गायकवाड यांना रिक्षाबाहेर खेचून बांबूच्या दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. सोनू आणि नरेश यांनी गायकवाड यांचे हात पकडून त्यांना जमिनीवर फरफटत नेऊन लाथाबुक्क्यांनी तुडवले.

यादरम्यान, एका अनोळखी साथीदाराने गायकवाड यांच्यावर चॉपरने थेट वार करून गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने त्यांची रिक्षा (क्र. MH 15 FU 3527) फोडून मोठे नुकसान केले.

Advertisement

२. द्वारका परिसरात रिक्षाचालकाला अडवून कोयत्याने वार; मोबाईल पळवण्याचा प्रयत्न

दुसरी घटना द्वारका परिसरातील पौर्णिमा बस स्थानक आणि पाटीदार भवन परिसरात मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री घडली. गणेश हिरळकर (रा. श्री अपार्टमेंट, पखालरोड) हे मध्यरात्री आपली ऑटो रिक्षा घेऊन घरी जात होते.

पाटीदार भवनजवळ लाल आणि पांढऱ्या हुड असलेल्या दोन रिक्षांमधून आलेल्या तीन अज्ञात भामट्यांनी हिरळकर यांना गाठले. त्यांनी हिरळकर यांना धमकावून त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. हिरळकर यांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार केला असता, एका भामट्याने रिक्षातून लोखंडी कोयता काढून त्यांच्या हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात हिरळकर गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

दोन्ही घटनांमधील गंभीर दुखापत आणि तोडफोडीप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणाचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक कल्पेश दाभाडे करत असून, दुसऱ्या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विजय म्हैसधुणे करत आहेत. रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांवर होणाऱ्या अशा हिंसक हल्ल्यांमुळे शहरभरातील रिक्षाचालकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.