रामवाडी पुलावर कारचालकाचा धुमाकूळ... महिला वाहतूक पोलिसाशी...

Share:
Main Image
Last updated: 13-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ ऑगस्ट - एकेरी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जाण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने एका माथेफिरू कारचालकाने कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलिसाशी उद्धटपणे आरेरावी करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रामवाडी पुलावर घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याप्रकरणी संशयित कारचालकाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

वाहतूक शाखेच्या युनिट २ च्या पोलीस अंमलदार ज्योती खरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास अंमलदार ज्योती खरे या रामवाडी पुलावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात वाहतूक नियमन आणि सुरळीत वाहतुकीसाठी सेवा बजावत होत्या.

त्याच वेळी गोदापार्क कडून अशोकस्तंभाच्या दिशेने जाणारा कारचालक आपल्या वाहनातून (क्र. MH 15 GF 8045) एकेरी वाहतुकीच्या (One-Way) विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता.

भररस्त्यात कार आडवी लावून गोंधळ

विरुद्ध दिशेने येणाऱ्या या कारचालकाला अंमलदार खरे यांनी अडवून पुढे जाण्यास विरोध केला. याचा प्रचंड राग आल्याने संशयित कारचालकाने आपली कार थेट भररस्त्यात आडवी लावली आणि वाहतुकीस अडथळा निर्माण केला.

Advertisement

खरे यांनी संयम राखून त्याला कार बाजूला घेण्याचा सल्ला दिला. मात्र, संशयिताने वाहनातून खाली उतरून पोलिसांशीच आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याने आरेरावीची भाषा वापरत अंमलदार खरे यांना ढकलून दिले आणि गंभीर परिणामांची धमकी देऊन तेथून पळ काढला.

वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

वर्दळीच्या रामवाडी पुलावर कारचालकाने भररस्त्यात वाहन उभे करून घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती. अवघ्या काही मिनिटांतच रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला पोलिसाशी झालेल्या या गैरवर्तनामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल

या धक्कादायक घटनेनंतर अंमलदार ज्योती खरे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित कारचालकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांशी धक्काबुक्की करणे व धमकी देणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक आंभोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, कारच्या क्रमांकावरून संशयिताचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.