नाशिककरांनो इकडे लक्ष द्या... शहरातील वाहतुकीत मोठे बदल...

Share:
Main Image
Last updated: 13-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १३ ऑगस्ट - श्रावण महिन्यानिमित्त धार्मिक स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी आणि शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, नाशिक शहर वाहतूक शाखेने दोन मोठे व महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंचवटीतील रामकुंड व कपालेश्वर मंदिर परिसरात श्रावणी सोमवार आणि शनिवारी वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे, तर दुसरीकडे मुंबई नाका परिसरातील वर्षानुवर्षांची ट्रॅफिक जॅमची समस्या सोडवण्यासाठी महामार्ग बस स्थानकाच्या प्रवेश व निर्गमन मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.

पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांनुसार या दोन्हीबाबतच्या अधिकृत अधिसूचना जारी केल्या आहेत.

१. श्रावण महिन्यात कपालेश्वर, रामकुंड परिसरात नो-व्हेइकल झोन

श्रावण महिन्यात श्री कपालेश्वर मंदिर आणि रामकुंड/गंगाघाट परिसरात दर्शनासाठी व पवित्र स्नानासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात. भाविकांची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १३ ऑगस्ट २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ या श्रावण कालावधीतील प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी सकाळी ६.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

हे मुख्य मार्ग राहतील 'प्रवेश बंद':

मालेगाव स्टँडकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे (रामकुंड) येणारा मार्ग.

खांदवे सभागृहाकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग.

सरदार चौकाकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग.

ढिकले वाचनालयाकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग.

'प्रवेश बंद'चे दिवस व वेळ (सकाळी ६ ते रात्री १०):

श्रावण शनिवार श्रावण सोमवार

१५ ऑगस्ट २०२६ १७ ऑगस्ट २०२६

२२ ऑगस्ट २०२६ २४ ऑगस्ट २०२६

Advertisement

२९ ऑगस्ट २०२६ ३१ ऑगस्ट २०२६

०५ सप्टेंबर २०२६ ०७ सप्टेंबर २०२६

अत्यावश्यक सेवांना सवलत:

हा नियम सर्वसामान्य व खासगी वाहनांसाठी लागू असेल. मात्र रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शववाहिका आणि पोलीस सेवेतील अत्यावश्यक वाहनांना या निर्बंधातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

२. मुंबई नाका परिसरातील ट्रॅफिक जॅम फुटणार; महामार्ग बस स्थानकाचे मार्ग बदलले

मुंबई नाका वर्तुळाला लागूनच असलेल्या महामार्ग बस स्थानकातून एसटी बसेस एकाच मुख्य प्रवेशद्वारातून ये-जा करत असल्याने या चौकात नेहमी भीषण वाहतूक कोंडी आणि रस्ता क्रॉसिंगचा त्रास होत असे. यावर तोडगा म्हणून वाहतूक पोलिसांनी बसेसच्या येण्या-जाण्याच्या मार्गांची पुनर्रचना केली आहे.

ही नवीन वाहतूक रचना १९ ऑगस्ट २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू राहील.

कशी असेल एसटी बसेसची नवीन रचना?

आगमन (प्रवेश मार्ग): सर्व एसटी बसेसना बस स्थानकात प्रवेश करण्यासाठी मुंबई नाका वर्तुळाला लागून असणारा साहेबा हॉटेलकडील मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

निर्गमन (बाहेर पडण्याचा मार्ग): बसेस बाहेर पडण्यासाठी रूची हॉटेलसमोरील गेट निश्चित करण्यात आले आहे.

नवी मार्गिका: रूची हॉटेलसमोरील गेट ➔ (डावीकडे वळण) ➔ सुयश हॉस्पिटल ➔ एसएसके हॉटेल ➔ चांडक सर्कल ➔ (उजवीकडे) शासकीय विश्रामगृह ➔ गडकरी सिग्नल ➔ (उजवीकडे) कालिकादेवी मंदिर ➔ संदीप हॉटेल ➔ रूची हॉटेल ➔ मुंबई नाका सर्कल.

एसटी प्रशासन व चालकांना कडक सूचना

वाहतूक पोलिसांनी एसटी महामंडळाला बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेश व निर्गमन द्वारांवर स्पष्ट दिशादर्शक व मार्गदर्शक सूचना फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व एसटी चालक व वाहकांना या नवीन नियमावलीची सविस्तर माहिती देण्याचे सूचित केले आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या चालक व वाहकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

आवाहन: रामकुंड परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच मुंबई नाका परिसरात प्रवाशांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.