फडणवीस सरकारचा आणखी एक शॉक... वीज बिल महागणार...

Share:
Main Image
Last updated: 13-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) १३ ऑगस्ट - महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना ऑगस्ट महिन्यात महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. जुलै महिन्यातील वीज वापरासाठी महावितरणने 'इंधन शुल्क' (Fuel Adjustment Charge) लागू केले असून, त्यामुळे चालू ऑगस्ट महिन्यात ग्राहकांना नेहमीपेक्षा जास्त रकमेचे वीज बिल हातात पडणार आहे. वीज वापराच्या स्लॅबनुसार घरगुती ग्राहकांना प्रति युनिट १० पैसे ते ६० पैसे अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

कोणाला किती अतिरिक्त दर पडणार? 

(वीज वापर स्लॅबनुसार)

वीज वापराच्या प्रमाणानुसार इंधन शुल्काची वर्गवारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:

दारिद्र्यरेषेखालील ग्राहक: १० पैसे प्रति युनिट

१०० युनिटपर्यंतचा वापर: २० पैसे प्रति युनिट

१०१ ते ३०० युनिट वापर: ४० पैसे प्रति युनिट

Advertisement

३०१ ते ५०० युनिट वापर: ५५ पैसे प्रति युनिट

५०० युनिटपेक्षा जास्त वापर: ६० पैसे प्रति युनिट

 शेतकऱ्यांवरील शुल्काचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर!

कृषी वीज वापरासाठीही इंधन शुल्क लागू करण्यात आले असून, वापरानुसार प्रति युनिट १५ पैसे आणि २५ पैसे शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा मोठा हिस्सा राज्य सरकारकडून सबसिडीच्या रूपात भरला जातो. त्यामुळे कृषी वीज वापरावरील या अतिरिक्त शुल्काचा प्रत्यक्ष भार शेतकऱ्यांऐवजी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडण्याची शक्यता आहे.

 का वाढली वीज बिलाची रक्कम? (महावितरणचे स्पष्टीकरण)

यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रात विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली होती. ही प्रचंड मागणी भागवण्यासाठी महावितरणला ऐन वेळी बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली.

या अतिरिक्त वीज खरेदीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठीच 'महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या' (MERC) निर्देशांनुसार इंधन समायोजन शुल्काद्वारे ही वसुली केली जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

महावितरणची नोंद: मागील काही वर्षांपासून दरवर्षी ऑगस्ट महिन्यात नियमानुसार अशा प्रकारचे इंधन शुल्क लागू केले जाते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ज्या ग्राहकांनी जास्त वीज वापरली आहे, त्यांना ऑगस्ट महिन्यात वाढीव बिलाचा सामना करावा लागेल.

Advertisement

Comments

No comments yet.