मनोहर शिंदे, (नाशिक) १३ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ३ आणि त्र्यंबकेश्वरमधील १० प्रमुख आखाड्यांव्यतिरिक्त, इतर आखाडे, आश्रम, मंदिरे आणि धार्मिक संस्थांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार कुंभमेळा प्राधिकरणाकडून कमाल ₹१५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित केली असून पात्र संस्थांना २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन स्तरांवर होणार प्रस्तावांची छाननी
प्राप्त प्रस्तावांची पारदर्शक तपासणी करण्यासाठी दोन स्तरांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत:
स्थानिक समिती (महापालिका व जिल्हा स्तर): नाशिक महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. या समित्या प्राप्त प्रस्तावांची ३१ ऑगस्टपर्यंत प्राथमिक छाननी करतील.
प्राधिकरणस्तरीय समिती: कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती स्थानिक समित्यांच्या शिफारशींनुसार प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी देईल.
अशा मिळतील सुविधा
या निधीचा वापर भाविकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, पार्किंग, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थापन उभारण्यासाठी केला जाईल.
"कुंभमेळ्यात विविध धार्मिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. भाविकांची संभाव्य संख्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन या निधीचे नियोजनबद्ध वाटप केले जाईल."
— शेखर सिंह (आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण)
महत्त्वाचे टप्पे:
प्रस्ताव सादरीकरणाची अंतिम मुदत: २५ ऑगस्ट २०२६
स्थानिक समितीची प्राथमिक छाननी: ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत