कुंभमेळा वर्क ऑर्डर घोटाळ्यातील आरोपी गिरीश महाजन यांचा नातेवाईक... महाजन म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 13-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १३ ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी काठावरील विकासकामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५९१ कोटी रुपयांचे बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयितांनी कंत्राटदारांची ३ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली असून, पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत जळगाव येथून दोन आरोपींना अटक केली आहे.

तनय महाजन हा या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी कुंभमेळ्यातील कामांच्या खोट्या वर्क ऑर्डर दाखवून विविध लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळले. तपासादरम्यान आरोपींचे व्यसनाधीन असणे आणि त्यांनी यापूर्वीही जामनेर परिसरात अशाच प्रकारे लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. व्यसनापायी आणि फसवणुकीच्या धंद्यांमुळे या तरुणांच्या कुटुंबांवर अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली असून, त्यांना आपली शेतजमीनही विकावी लागली आहे.

माझा किंवा कुटुंबाचा काहीही संबंध नाही: मंत्री गिरीश महाजन

या घटनेवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

दूरचा नातेवाईक पण हयगय नाही: "अटकेतील आरोपी तनय महाजन हा माझा अत्यंत दूरचा नातेवाईक आहे. मात्र, त्याच्याशी किंवा आमच्या कुटुंबाशी या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत," असे महाजन यांनी स्पष्ट केले.

स्वतः केली तक्रार: "हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. मी स्वतः या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. आरोपी नातेवाईक असो वा अन्य कोणी, कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. पोलीस प्रशासनाला निष्पक्ष आणि कडक कारवाईचे पूर्ण अधिकार दिले आहेत," असा इशारा त्यांनी दिला.

इतर मोठ्या नावांची शक्यता: बनावट वर्क ऑर्डरद्वारे आणखी काही कंत्राटदारांची फसवणूक झाली असण्याची शक्यता वर्तवत, या प्रकरणात आणखी कोणती मोठी नावे किंवा आर्थिक व्यवहार समोर येतात का, याचा शोध तपासातून लवकरच लागेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

सध्या पोलीस या रॅकेटच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत असून, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

Advertisement

Comments

No comments yet.