साधूचा कारनामा... संमोहित करून वृद्धाचे...

Share:
Main Image
Last updated: 12-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट - आडगाव परिसरात चालत्या कारमधील तोतया साधूने एका वृद्धाला बोलण्यात गुंतवून व संमोहित करून त्यांच्याकडील सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

Advertisement

हनुमाननगर येथील 'पार्क साईड होम्स'चे रहिवासी नरेंद्र हेरंबाजी कामनवार (वय ६९) हे मंगळवारी (दि. ११) सकाळी नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. वळी मंदिराकडून ते पार्क साईडच्या दिशेने पायी जात असताना, रायते हॉस्पिटलजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारमधील साधूच्या वेषातील इसमाने त्यांना आवाज देऊन जवळ बोलावले.

कामनवार कारजवळ गेले असता, भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून संमोहित केले. यानंतर कामनवार यांच्या गळ्यातील १.५ तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट आणि ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण ८० हजारांचा ऐवज काढून घेत तोतया साधू आणि कारचालकाने तिथून पोबारा केला.

हातचलाखी आणि संमोहन उघडकीस येताच कामनवार यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून कारचालक आणि तोतया साधूविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.