पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत होते... घुसखोर बांगलादेशींना नाशिक पोलिसांनी असे धरले...

Share:
Main Image
Last updated: 12-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १२ ऑगस्ट - भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्यासाठी निघण्याच्या तयारीत असलेल्या एका बांगलादेशी पुरूष व महिलेला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने नाशिकरोड बस स्थानकाजवळ सापळा रचून अटक केली आहे.

गुप्त बातमीदाराकडून मिळाली माहिती

गुन्हे शाखा युनिट-२ चे अंमलदार प्रदीप नन्नवरे व संतोष सुपेकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अवैध मार्गाने घुसखोरी केलेले एक पुरुष व महिला बांगलादेशी नागरिक नाशिकरोड बस स्थानकातून पुण्यासाठी प्रवास करणार आहेत. या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दामिनी पथकासह विशेष पथक तयार केले.

अटक करण्यात आलेले संशयित:

१. मोहम्मद साकीब मुल्ला (वय २२, मूळ रा. खुलता, जि. नराईल, राज्य खुलना, बांगलादेश)

Advertisement

२. नाहीदा बादशाह मुल्ला (वय २१, रा. सगोलसिरा, जि. नराईल, राज्य खुलना, बांगलादेश)

कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल

नाशिकरोड बस स्थानकाजवळील पोलीस चौकीशेजारी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रवास करण्यासाठी लागणारे कोणतेही वैध कागदपत्रे किंवा व्हिसा आढळून आला नाही. भारत-बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अवैध मार्गाने घुसखोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ आणि दामिनी पथकाने फत्ते केली.

Advertisement

Comments

No comments yet.