एस.के. खेडकर, (नाशिक) १२ ऑगस्ट - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ मधील कामांचे टेंडर मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी १७ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट-१ ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात जामनेर (जि. जळगाव) येथील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
भारत सरकारची राजमुद्रा, 'नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणा'चे बनावट लेटरहेड आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल सही व मनपाच्या टेंडर नंबरचा वापर करून हा कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला.
अशी केली फसवणूक
संशयितांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी कुंभमेळ्यातील कामांची एक बनावट यादी तयार केली. सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, नाशिकरोडच्या नावाने बनावट शासकीय पत्रव्यवहार दाखवून फिर्यादीला 'हाउसकीपिंग'चे काम (वर्क ऑर्डर) मंजूर करून दिल्याचे खोटे भासवले. यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने तब्बल २ कोटी १७ लाख ५० हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून शकील अहमद सलीम्मुद्दीन शेख, तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता (गु.र.नं. ४८१/२०२६, ४८२/२०२६, ४८३/२०२६).
जामनेरमधून संशयितांना ठोकल्या मुसक्या
कुंभमेळ्याच्या नावाने झालेली मोठी आर्थिक फसवणूक आणि शासकीय यंत्रणेची बनावट कागदपत्रे बनवल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले.
गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. आरोपी जामनेर येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले:
१) तनय अनंत महाजन (वय ३२, रा. पाचोरा रोड, प्रियंका पॅलेस समोर, जामनेर)
२) नरेंद्र तोताराम महाजन (वय ५१, रा. देशमुख गल्ली, जामनेर)
गहन चौकशीदरम्यान दोन्ही संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपासासाठी त्यांना नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तपास पथक
ही धडक कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी संदीप पवार, पो.उ.नि. चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, रमेश शिंदे, तसेच अंमलदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, मुश्रीफ शेख, नाझीमखान पठाण, मिलिंदसिंग परदेशी, महेश साळुंके, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, सुनील भोसले, शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, चालक समाधान पवार, दीपक दिवटे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या म.स.पो.नि. जया तारडे यांच्या पथकाने केली.