मुंबई, (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट - नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सिडको, कामटवाडा आणि सातपूर परिसरातील घरांवरून गेलेल्या धोकादायक उच्चदाबाच्या वीजवाहिन्या (High Tension Wires) तातडीने भूमिगत करा, असे कडक निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल, तेथे नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मुंबईतील निर्मल भवन येथे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर विशेष आढावा बैठक पार पडली. सिडको आणि सातपूर भागातील दाट लोकवस्तीच्या घरांवरून वीजवाहिन्या गेल्याने पावसाळ्यात तुटून अपघाताची मोठी भीती व्यक्त केली जात होती. यासाठी स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी या वाहिन्या भूमिगत करण्याची सातत्याने मागणी केली होती.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व निर्णय:
९२.७४ कोटींचा सुधारित प्रस्ताव: महावितरण प्रशासनाने कामटवाडा आणि सातपूर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी ९२.७४ कोटी रुपयांचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) १० ऑगस्ट २०२६ रोजी मुख्य कार्यालयाकडे पाठवला आहे.
६ नवीन उपकेंद्रांना मंजुरी: 'एडीबी' (ADB) योजनेअंतर्गत नाशिक पश्चिम मतदारसंघात ६ नवीन वीज उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
डीपीडीसी कामांचा आढावा: डीपीडीसी योजनेतील १४ कामांपैकी ८ कामे पूर्ण झाली असून २ प्रगतीपथावर आहेत. तर ३ ऑगस्ट २०२६ रोजी मंजुरी मिळालेली उर्वरित ४ कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
१००% कामांची पूर्तता करा: सुरू असलेल्या सर्व विकासकामांची यादी लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावी आणि ही सर्व कामे वेळेत व १००% पूर्ण झाली पाहिजेत, असे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला आमदार सीमा हिरे यांच्यासह महावितरण व महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक, नाशिकचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व व्हीसीद्वारे उपस्थित होते.