त्र्यंबकेश्वरमध्ये साकारणार 'शिवदर्शन पथ'... घरे, दुकाने पडणार? बैठकीत काय ठरलं?

Share:
Main Image
Last updated: 12-Aug-2026

त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्वकाळाचे औचित्य साधून त्र्यंबकेश्वर शहरात राबवण्यात येणाऱ्या 'हेरिटेज स्ट्रीट डेव्हलपमेंट' योजनेच्या आढावा बैठकीत नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार करत अनेक शंका उपस्थित केल्या. त्र्यंबकेश्वर मंदिर ते कुशावर्त तीर्थ (मेनरोड) या मार्गावर ही योजना राबवली जाणार असून, नाशिकच्या 'रामकाल पथा'च्या धर्तीवर येथे 'शिवदर्शन पथ' तयार केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (MSIDC) मार्फत या परिसरातील १५० घरांचे सुशोभीकरण करण्याची ही महत्वाकांक्षी योजना आहे. या बैठकीत अधिकाऱ्यांनी पडद्यावर (प्रोजेक्टर) चित्रे दाखवून घरांचे सौंदर्य कसे वाढेल, याची संकल्पना स्पष्ट केली.

नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रमुख शंका:

तोडफोड व नुकसान: योजनेदरम्यान घरांची तोडफोड होणार का? तसेच काम करताना जुन्या घरांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?

देखाभाल व दुरुस्ती: सुशोभीकरण झाल्यानंतर भविष्यात या पथाची आणि घरांची देखभाल-दुरुस्ती (मेंटेनन्स) कोण करणार?

पायाभूत सुविधांना प्राधान्य: सुशोभीकरणाआधी रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करा, मगच या योजनेचा विचार व्हावा.

Advertisement

गंगा स्लॅब मुद्दा: मेनरोडवरील गंगा नदीवरील स्लॅब ओपन केला जाणार आहे का?

शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचा खुलासा:

१००% शासकीय खर्च: या प्रकल्पाचा सर्व खर्च शासनामार्फतच केला जाईल, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांची संमती अनिवार्य: रहिवाशांकडून औपचारिक संमतीपत्रे (Consent Letters) भरून घेतल्यानंतरच कामाला सुरुवात केली जाईल. कुशावर्त चौक परिसरातील नागरिकांनी त्वरित संमती दिल्यास ध्वजारोहणापूर्वीच सुशोभीकरणाचा चेहरामोहरा दिसेल.

सौंदर्यात भर पडणार: या प्रकल्पामुळे घरांचे मूळ सौंदर्य अधिक खुलेल आणि शहराच्या वैभवात भर पडेल, असा विश्वास नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी व्यक्त केला.

सहकार्याचे आवाहन: नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी सर्व नागरिकांना व घरमालकांना या विकासकामात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला भूषण भुतडा, हर्षल भालेराव, अनंत पाचोरकर, भूषण शिखरे, चांदवडकर बंधू, चेतन उगले, कान्नव, संजय कदम, अतुल जोशी, लोहगावकर गुरू यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक घरमालक व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत गायधनी यांनी मानले.

Advertisement

Comments

No comments yet.