नाशिक, (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट - वडिलांनी शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने २४ वर्षीय युवकाला घराबाहेर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिंदेगावात घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल गणेश पवार, ओमकार हरिश्चंद्र साळवे आणि शुभम कापसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रथम शांताराम जाधव (वय २४, रा. सप्तशृंगी नगर, शिंदेगाव) या युवकाने फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय?
घराबाहेर बोलावून मारहाण: रविवारी (दि. ९) रात्री प्रथम जाधव हा आपल्या घरी असताना संशयित तिघांनी त्याच्या घराजवळ जाऊन त्याला घराबाहेर बोलावून घेतले.
वडिलांच्या शिवीगाळाचा जाब: संशयितांनी प्रथमला रुद्रा सुपर मार्केट परिसरात नेले आणि "तुझ्या वडिलांनी अतुल पवारला शिवीगाळ का केली?" असा जाब विचारत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
धारदार शस्त्राने वार: वाद वाढल्याने संशयित अतुल पवार याने सोबत आणलेल्या धारदार लोखंडी शस्त्राने प्रथमवर थेट वार केले. या प्राणघातक हल्ल्यात प्रथम गंभीर जखमी झाला आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, नाशिकरोड पोलिसांनी तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.