त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात या दर्शनावर बंदी... या भाविकांना प्रथम प्राधान्य

Share:
Main Image
Last updated: 12-Aug-2026

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात पवित्र श्रावण महिन्यानिमित्त होणारी अलोट गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टने एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या काळात कथित व स्वयंघोषित 'व्हीआयपी' दर्शनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून सामान्य भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा सह धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने यांनी अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्व विश्वस्तांच्या सूचनेनुसार हे नवे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात ओळख सांगून किंवा वशिल्याने दर्शन घेणाऱ्या 'कथित' व्हीआयपींची मोठी रांग लागते, ज्यामुळे तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर यंदा व्हीआयपी पास व विशेष दर्शनाची सुविधा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय प्रोटोकॉलसाठी वेळ व संख्येचे कडक बंधन

Advertisement

ज्या व्हीआयपींना अधिकृत 'शासकीय प्रोटोकॉल' लागू आहे, त्यांच्यासाठीही प्रशासनाने नियमावली अधिक कडक केली आहे:
वेळेची अट: शासकीय प्रोटोकॉल असलेल्या मान्यवरांना केवळ रात्री ८:०० वाजता दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.

संख्या मर्यादा: एका वेळी जास्तीत जास्त २० व्यक्तींनाच प्रवेश मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इतिहासात व्हीआयपी दर्शनासाठी वेळ आणि संख्येचे असे कडक बंधन घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे यंदा श्रावण महिन्यात सर्वसामान्य भाविकांना रांगेत जास्त वेळ न ताटकळता भावपूर्ण दर्शन घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हे पारदर्शक नियोजन संपूर्ण श्रावण महिनाभर टिकून राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिक व भाविकांकडून व्यक्त होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.