येवल्यात भरधाव कारची धडक... दारूच्या नशेतील कार चालक फरार...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

येवला, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट - वृत्तांकनासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार विलास कांबळे यांना एका भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना येवला शहरातील फत्तेपूर नाका परिसरातील हॉटेल वर्मा पॅलेससमोर घडली. या भीषण अपघातात कांबळे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्यात आली आहे. अपघातानंतर चालक कारसह घटनास्थळावरून पसार झाला.

नेमकी घटना काय?

रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बोहरी पेट्रोल पंपाजवळ एकलव्य संघटनेची मिरवणूक सुरू होती. ज्येष्ठ पत्रकार विलास कांबळे हे या कार्यक्रमाचे बातमी वृत्तांकन करण्यासाठी दुचाकीने गेले होते. हॉटेल वर्मा पॅलेससमोर रस्त्याच्या कडेला दुचाकीवर उभे असताना, कोपरगाव बाजूकडून येवल्याच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या सेंट्रो कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

मध्य प्रदेश पासिंगची गाडी; गाडीवर 'पोलीस' पाटी

दारूच्या नशेत चालक: मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त सेंट्रो कार ही मध्य प्रदेश (MP) पासिंगची असून, ड्रायव्हर सीटच्या बाजूला 'पोलीस' अशी पाटी लावलेली होती. कारमधील दोन्ही इसम दारूच्या नशेत धुंद होते.

Advertisement

अपघातानंतर पोबारा: धडक दिल्यानंतर चालकाने गाडी न थांबवता घटनास्थळावरून थेट पळ काढला.

पोलीस बंदोबस्त असूनही पोलिसांची बघ्याची भूमिका; फक्त लेडीज होमगार्ड मदतीला!

अपघाताच्या ठिकाणी येवला शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. मात्र, अपघात घडल्यानंतर तेथे उपस्थित होमगार्ड कर्मचाऱ्यांनी केवळ 'बघ्याची भूमिका' घेतली. खुद्द पीडित पत्रकाराने "गाडीचा फोटो काढा किंवा गाडी अडवा" असे सांगूनही पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही किंवा गाडी अडवण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर तेथील एका महिला (लेडीज) होमगार्डने प्रसंगावधान राखत जखमी कांबळे यांना उचलून रस्त्याच्या कडेला बसवले.

तपास आणि कारवाईची मागणी

सध्या विलास कांबळे यांच्यावर येवल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाताला मोठी दुखापत झाल्याने त्यांच्या हातावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भरधाव कार चालवून जीवाला धोका निर्माण करणाऱ्या आणि अपघातानंतर पळून गेलेल्या त्या अज्ञात कार चालकाचा येवला शहर पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन कडक गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अपघातग्रस्त ज्येष्ठ पत्रकार विलास कांबळे यांनी केली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.