पाठलाग करण्याचा जाब विचारल्याने तरुणीला... मुक्तीधाम भागातील घटना...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट - पाथर्डी फाटा ते मुक्तीधाम परिसरापर्यंत दुचाकीने पाठलाग करून अश्लील हावभाव करणाऱ्या संशयिताला जाब विचारला असता, त्याने भररस्त्यात तरुणीचे केस पकडून शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजपूत (वय ३२, रा. आप्पासाहेब अरिंगळे मळा, सिन्नर फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सामनगाव रोड परिसरातील २१ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

नेमकी घटना काय?

Advertisement

रस्ता विचारताना अश्लील हावभाव: मार्केटिंगचा व्यवसाय करणारी पीडित तरुणी रविवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाट्यावरून वडनेररोडमार्गे दुचाकीने घरी जात होती. आर्टिलरी सेंटरजवळ रस्ता चुकल्याची जाणीव झाल्याने तिने केंद्रीय विद्यालय परिसरात दुचाकीवर बसलेल्या संशयिताकडे रस्त्याची विचारपूस केली. त्यावेळी संशयिताने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले.

मुक्तीधामपर्यंत पाठलाग: प्रकार लक्षात येताच तरुणीने तेथून काढता पाय घेतला; मात्र संशयिताने थेट मुक्तीधाम भागापर्यंत तिचा पाठलाग केला.

मित्राला बोलावले अन् मारहाण: तरुणीने प्रसंगावधान राखत मित्राशी संपर्क साधून आपबिती सांगितली. मित्राने तिला मुक्तीधाम येथील एका दुकानाजवळ थांबण्यास सांगितले. तरुणी मित्राजवळ पोहोचताच पाठीमागून आलेल्या संशयिताने तेथेही धिंगाणा घातला. तरुणीच्या मित्राने पाठलागाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताने संतापाच्या भरात भररस्त्यात तरुणीचे केस पकडून तिला शिवीगाळ व मारहाण केली.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. उपनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार संतोष गोसावी पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.