कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-नांदुरी रस्ता रुंदीकरण... पाहणीनंतर आयुक्त म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) ११ ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून नाशिक–नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची मंगळवारी (दि. ११) सकाळी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी रस्त्याच्या गुणवत्तेवर विशेष भर देत, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि काम वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, कुंभमेळा प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी, संबंधित कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि तृतीय पक्ष गुणवत्ता नियंत्रण पथकातील (Third Party Audit) अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान घेतलेले प्रमुख आढावे:

भौतिक प्रगती व अडचणी: रस्त्याच्या रुंदीकरणाची सध्याची प्रगती, भूसंपादन, युटिलिटी (वीज, पाणी इत्यादी वाहिन्यांचे) स्थलांतर आणि कामातील तांत्रिक अडथळ्यांची सविस्तर माहिती घेण्यात आली.

गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा: आयुक्तांनी थेट गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी करून प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक निकष आणि मानकांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले.

Advertisement

आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश:

गुणवत्तेत तडजोड नको: बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही हलगर्जी किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही. तपासणीत आढळणाऱ्या त्रुटींची तातडीने दुरुस्ती केली पाहिजे.

नियमित चाचण्या व नोंदी: कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेल्या तांत्रिक चाचण्या नियमितपणे घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे.

यंत्रणांमध्ये समन्वय: सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण पथकाने आपापसांत समन्वय ठेवून नियोजित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करावे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर भाविकांच्या प्रवासाची सोय आणि वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी प्राधिकरणाकडून रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

 

Advertisement

Comments

No comments yet.