नाशिक पोलीस दलात अचानक खांदेपालट...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ११ ऑगस्ट - कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासकीय निकड लक्षात घेऊन नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस दलात अचानक अंतर्गत खांदेपालट केली आहे. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या अंबड आणि उपनगर या दोन महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या परस्पर बदल्यांचे तात्पुरते आदेश मंगळवारी (दि. ११) जारी करण्यात आले.  

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत भरत शिरसाठ यांची अंबड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. तर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग नवलसिंग राजपूत यांची उपनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (सुधारणा २०१४ व अध्यादेश २०१५) मधील कलम २२न, पोटकलम (२) मधील प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश दिले आहेत.  

तत्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश

संबंधित दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त व्हावे आणि पदभार स्वीकारून त्याचा अनुपालन अहवाल पोलीस आयुक्त कार्यालयाकडे तात्काळ सादर करावा, असे स्पष्ट निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत. शहरात औद्योगिकदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अंबड आणि परिसर मोठा असलेल्या उपनगर पोलीस ठाण्यातील या अचानक झालेल्या अदलाबदलीमुळे पोलीस वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

चार दिवसांपूर्वीच झाल्या या बदल्या

Advertisement

शहर पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय कारणास्तव चार पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. शहर वाहतूक शाखा आणि प्रमुख पोलीस ठाण्यांच्या कामकाजात गती व सुसूत्रता आणण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे समजते.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नवी नियुक्ती पुढीलप्रमाणे:

सुरेश आव्हाड: सरकारवाडा पोलीस ठाण्यातून गंगापूर पोलीस ठाणे (प्रभारी अधिकारी)

युवराज पत्की: शहर वाहतूक शाखा, युनिट क्र. २ येथून सरकारवाडा पोलीस ठाणे (प्रभारी अधिकारी)

अशोक शरमाळे: गंगापूर पोलीस ठाण्यातून शहर वाहतूक शाखा, युनिट क्र. २ (प्रभारी अधिकारी)

संजय पिसे: नियंत्रण कक्षातून शहर वाहतूक शाखा, सातपूर-एक्सलो युनिट (प्रभारी अधिकारी, तात्पुरती नियुक्ती)

आदेश जारी होताच संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तातडीने आपापल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.