मासे खरेदीच्या ओळखीने घातला २५ लाखांचा गंडा...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट - फायनान्स कंपनीकडून तब्बल चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका मासे व्यावसायिकाची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताने प्रोसेसिंग फी आणि विविध कारणांचा बहाणा करून ही रक्कम उकळली. दीड महिना उलटूनही कर्जाची रक्कम न मिळाल्याने अखेर पीडित व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली असून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलेश टिकमदास तेजवाणी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अश्रफ अफसर शेख (रा. वडाळारोड) यांनी तक्रार दिली आहे. शेख यांचा वडाळागावात 'आक्सा फिश सेंटर' नावाचा मासे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित कमलेश हा शेख यांच्या दुकानात नियमितपणे मासे खरेदीसाठी येत असल्याने दोघांची ओळख झाली होती.

या ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने शेख यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदतीचा सल्ला दिला. फायनान्स कंपनीकडून मोठे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याने, शेख यांनी २५ लाख रुपये संशयिताला दिले.

अशी झाली फसवणूक:

Advertisement

२७ जून रोजी व्यवहार: शेख यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून ४ कोटी रुपयांच्या कर्जासाठी २७ जून रोजी आवश्यक कागदपत्रे संशयिताकडे सोपवली.

वेगवेगळ्या कारणांनी वसुली: कर्जाची प्रक्रिया पुढे ढकलत संशयिताने प्रोसेसिंग फी, स्टॅम्प ड्युटी, टीडीएस चलन भरणा आणि सुरक्षित व्यवहाराच्या नावाखाली वेळोवेळी २५ लाख रुपये उकळले.

टाळाटाळ अन् पोलीस तक्रार: दीड महिना उलटूनही कर्जाची रक्कम किंवा उकळलेले पैसे परत न मिळाल्याने शेख यांनी वारंवार विचारणा केली. मात्र, संशयिताकडून टाळाटाळ केली जात असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.